मोदी आवास योजनेतील घरकुलासाठी तात्काळ निधीची तरतूद करावी ; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली लेखी निवेदनाद्वारे मागणी

सांगोला तालुक्यात निधी आभावी रखडलेल्या मोदी आवास योजनेतील घरकुलांसाठी तात्काळ निधीची तरतूद करावी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या रखडलेल्या घरकुलाच्या कामांना गती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे सहकार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. याबाबत दिपक आबांनी नुकतीच मुंबई येथे अतुल सावे यांची भेट घेतली यावेळी प्रवीण नवले विनायक मिसाळ य. मंगेवाडीचे उप सरपंच अनिल पाटील आदी उपस्थित होते.
इतर मागास प्रवर्गातील 1391 नागरिकांना मोदी आवास घरकुल योजनेतून घरकुल मंजूर आहेत. यापैकी सर्व 1391 लाभार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार रुपये प्रमाणे पहिला हप्ता देण्यात आला आहे. तर यापैकी 371 लाभार्थ्यांना दुसरा हप्ता प्रत्येकी 45 हजार रुपये तसेच 127 लोकांना प्रत्येकी 40 हजार रुपये प्रमाणे तिसरा हप्ता देण्यात आला आहे. तर फक्त 2 लोकांना अंतिम 20 हजार प्रमाणे हप्ता अदा करण्यात आला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेसाठी निधीची तरतूद नसल्याने तालुक्यातील सर्व घरकुलांचे काम अर्ध्यावर रखडले आहे. प्रशासनाकडे निधी मागणीचे प्रस्ताव पाठवूनही संबंधित योजनेसाठी निधी नसल्याने मोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी थेट राज्याचे सहकार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील नागरिकांना रखडलेले अनुदान मिळण्याबाबत त्यांना निवेदन दिले.
दिपकआबांच्या निवेदनानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी तात्काळ सबंधित विभागाला सूचना देऊन सांगोला तालुक्यातील सर्व रखडलेल्या घरकुलांना अनुदान देण्याचे आदेश दिले. गेली २ ते ४ महिने रखडलेला अनुदानाचा प्रश्न दिपकआबांच्या प्रयत्नातून मार्गी लागणार असल्याने मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांमधून समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.