साताऱ्यातील शाळा व महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार 26 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

शाळा व महाविद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत संबधित शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, तसेच इयत्ता 10वी व 12 वी च्या जुलै 2024 च्या फेर परीक्षा राज्य मंडळ पुणे यांचे वेळापत्रकानुसार सुरू राहतील.

वीर धरणणाची पाणी पातळी 579.67 मीटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा 9.20 टीएमसी झाला आहे.  वीर धरण 97.83 टक्के इतके भरले असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत संततधार पाऊस पडत आहे. वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीमध्ये दुपारी 3 वाजता 55644 क्युसेक्स इतका विसर्ग सुरु असून पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सुरक्षिततचेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button