महाराष्ट्र
परीक्षा केंद्र परिसरात कलम 163 लागू; परीक्षा कालावधीत विविध इलेक्ट्रीक उपकरण, साहित्य आणि इतर साधनांचे वापरास बंदी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे मार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीचे कार्यक्षेत्रातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात आल्या आहेत. सदर परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी परीक्षा कालावधीत केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.
इयत्ता 12 वी ची परीक्षा दि.11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान घेण्यात येत आहे. परीक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे यासाठी परीक्षा कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळात पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीचे कार्यक्षेत्रातील सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीचे कार्यक्षेत्रातील सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे. परीक्षा केंद्राच्या परिसरात सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करणे. परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरातील झेरॉक्स, फॅक्स सेंटर, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनीक्षेपक, संगणक केंद्र, इंटरनेट कॅफे अशा दळणवळण सुविधा आणि पानपट्टी कार्यरत ठेवणे. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, सेल्युलर फोन, वायरलेस सेट, ट्रान्झीटर व इतर माध्यमासह प्रवेश करणे, परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणत्याही वाहनांस प्रवेश करणे. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित नसलेली व्यक्ती (उमेदवारांचे नातेवाईकासह) परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात प्रवेश करणे.परिक्षे केंद्रापासुन 100 मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सदरचा आदेश परीक्षा प्रक्रियेशी संबंधीत सर्व शासकीय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवृंद, परीक्षार्थी, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड यांना त्यांचे परीक्षेसबंधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाही. हा आदेश दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते दि 18 मार्च 2025 या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 09.00 वा. ते सायं.6 00 वा. पर्यंत सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परीसरात लागू राहील.या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. असे आदेश पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) सोलापूर अजित बोऱ्हाडे यांनी दिले आहेत.