बहुभाषिक होणे काळाची गरज : डॉ.संजय मुजमुले

सांगोला /प्रतिनिधी : येथील सांगोला महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, हिंदी विभाग व महाराष्ट्र हिंदी परिषद, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि १९ सप्टेंबर २०२४ रोजी ‘हिंदी दिवस समारोह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यशवंतभाऊ पाटील महाविद्यालय, भोसे (क) तालुका पंढरपूर चे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय मुजमुले होते. या समारंभा प्रसंगी ‘युगधारा’ या भित्ती पत्रकाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. या भित्ती पत्रकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कविता, कथा, निबंध अश्या साहित्य प्रकारात आपले मौलिक लेखन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात संत कबीरदास यांच्या प्रतिमा पूजनाने झाली . या वर्षी ‘हिंदी दिवस’ निमित्त हिंदी सप्ताह आयोजित केला होता .त्या अंतर्गत निबंध लेखन, कथा लेखन व लघुसंदेश लेखन स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुणे डॉ. संजय मुजमुले यांनी आजच्या संदर्भात हिंदी भाषेचे महत्व विषद केले. हिंदी भाषा अतिशय सोपी, सरळ व कोमल भाषा असून ती पूर्ण भारत भर संपर्काचे साधन म्हणून काम करत आहे. ती भारतातील बहुसंख्य लोकांची व्यवहाराची भाषा असून भारतीयांना जोडून ठेवण्याचे काम करत आहे. भारत सरकारच्या सर्व कार्यालयामध्ये तिचा राजभाषा म्हणून उपयोग होत आहे. बँक, रेल्वे, विदेश मंत्रालय, दूरसंचार, डाक इत्यादी विभागात हिंदी भाषे मधून व्यवहार केला जातो. हिंदी भाषेच्या माध्यमातून समाजाशी सहज एकरूप होता येत असेही मत त्यांनी मांडलं. या प्रसंगी त्यांनी आजच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांनी बहुभाषिक होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. महाविद्यालाचे प्र.प्राचार्य डॉ सुरेश भोसले यांनी भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य विकसित करण्यावर जोर द्यावा असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी श्रवण, वाचन, उच्चारण, लेखन शुद्धता या बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्या आत्मसात कराव्या असे ते म्हणाले. हिंदी दिवस समारोह निमित्त महाविद्यालाच्या ग्रंथालयात ग्रंथपाल श्री. नरेंद्र पाटील यांनी हिंदी विषयाचे ग्रंथ प्रदर्शन भरविले होते, त्याचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष चे समन्वयक डॉ राम पवार तसेच डॉ बबन गायकवाड, डॉ अमोल पवार, डॉ मच्छींद्र वेदपाठक, डॉ अर्जुन मासाळ इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते. हिंदी दिवस समारोह या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. नवनाथ शिंदे, आभार प्रदर्शन डॉ. मालोजी जगताप यांनी तर सूत्र संचालन कु. दिपाली बसवदे या विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमासाठी हिंदी विभागातील ६७ विद्यार्थी उपस्थित होते.