शालेय जीवनात शिस्त महत्वाची असून विद्यार्थ्यांनी करिअरचे ध्येय, उद्दिष्ट ठरवून त्यासाठी कष्ट घेतले पाहिजे.स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द,चिकाटी व कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे प्रतिपादन सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी तथा असिस्टंट कमांडंट अक्षय पाटील यांनी केले.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मध्ये करिअर गाईडन्स विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘ स्पर्धा परीक्षेची तयारी ‘ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद,तलाठी कु.स्नेहल पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना असिस्टंट कमांडंट अक्षय पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी इ.१२ वीचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी दर्जा व गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड न करता सक्षम होणे गरजेचे आहे.जीवनात अपयश पचवण्याची तयारी असली पाहिजे.विद्यार्थ्यांनी प्लॅन ‘बी’ तयार ठेवून स्पर्धा परीक्षेची सकारात्मक दृष्टिकोनातून तयारी करावी.वेळेचे सूक्ष्म नियोजन करावे.अपयशाने खचून न जाता भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.माजी विद्यार्थीनी तथा तलाठी कु.स्नेहल पाटील म्हणाले की,विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न व नियोजन करावे.आई,वडील व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे,मात्र निर्णय स्वतः घ्यावा.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अमोल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळेल.सोशल मीडिआचा वापर कमी करावा. संघर्षातून प्रेरणा,वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेत विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असे सांगत विविध प्रेरणादायी प्रसंग, उदाहरणे सांगता मौलिक प्रबोधन केले. यावेळी अक्षय पाटील यांनी इ.८ वी स्कॉलरशिप व एन.एम.एम.एस.वर्गाना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य अमोल गायकवाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व ‘ सांगोल्याचे बापूजी ‘ ग्रंथ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत प्रा.गणेश घेरडीकर,पाहुण्यांचा परिचय प्रा. सचिन चव्हाण,सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र कुंभार यांनी केले तर प्रा. नवनाथ बंडगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Back to top button