सांगोला – अल्पवयीन मुलांना हाताशी धरून दुचाकी चोरी करणा-या म्होरक्याच्या पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचेकडून चोरीच्या सुमारे ५ लाख ९ हजार रुपये किमतीच्या १३ दुचाकी सांगोला तालुक्यासह जत जि.सांगली येथून हस्तगत ( जप्त ) केल्या आहेत. दरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी आकाश शशिकांत हातेकर रा.घेरडी ता सांगोला यास १ ऑगस्ट रोजी अटक करून सांगोला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस बुधवार ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे तर गुन्ह्यातील अल्पवयीन दोन्ही मुलांच्या नातेवाईकांना समजपत्र देऊन त्यांच्या ताब्यात दिल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भारत काकासो म्हारनुर ( रा हबिसेवाडी ता सांगोला ) यांची ३५ हजार रुपये किमतीची बिगर नंबरची दुचाकी १३ जुलै रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्याने डिकसळ ता सांगोला येथील शिवनेरी हॉटेल डिकसळ पाटी येथून चोरून नेली होती याबाबत, त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भानवसे यांचेसह पोलीस कर्मचारी करीत होते दरम्यान ३१ जुलै रोजी रात्री १०:१५ च्या सुमारास कडलास पेट्रोल पंपावर दोन अल्पवयीन मुले चोरीच्या दुचाकीसह मिळून आले होते, तेथील पंपावरील कर्मचारी दत्तात्रय संजय गायकवाड ( कडलास )यांच्या मदतीने अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी बाबत चौकशी केली असता त्याने सदरची दुचाकी चोरीची असल्याचे कबुली दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांनी दुचाकी चोरी करून त्या आकाश शशिकांत हातेकर ( रा घेरडी ता. सांगोला ) यास विक्री केल्याबाबत सांगितले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन सखोल तपास चौकशी केली असता वरील दुचाकी चोरीचे रॉकेट उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी सांगोला तालुक्यातून ९ व जत जि. सांगली येथून ४ दुचाकी अशा १३ दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भानवसे पोलीस कॉन्स्टेबल बजरंग बोराटे पोलीस नाईक अंकुश नलवडे, पोलीस कॉन्स्टेबल निशांत सावंजी, पोलीस कॉन्स्टेबल रवी साबळे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल भुजबळ यांच्या पथकाने केला