अज्ञात चोरट्याने घराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरातील कपाटातील २ लाख ७५ हजार रुपये सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गणेशवाडी, कडलास (ता. सांगोला) येथे ९ ऑगस्ट रात्री साडेआठ ते दहा ऑगस्ट रोजी सकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे.
जनाबाई सोपान गायकवाड (रा. गणेशवाडी, कडलास, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या व त्यांचे पती ९ ऑगस्ट रोजी साडेआठच्या सुमारास जेवण करून रात्री साडे अकराच्या सुमारास घरामध्ये झोपी गेले होते. १० ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे सकाळी सहाच्या सुमारास झोपेतून उठून झाडलोट करीत असताना घराचा जिन्याच्या बाजूस असलेल्या लोखंडी गेटचे कुलूप तुटलेले दिसले. यावेळी त्यांनी पती सोपान गायकवाड यांना ही गोष्ट सांगितली. फिर्यादीने घरात येऊन लोखंडी कपाटात पाहिले असता सोन्याचे दागिने मिळून आले नाहीत. यावरून त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्याने लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातील २ लाख ७५ हजार रुपये विविध प्रकारचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद जनाबाई गायकवाड यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिली असल्याची माहिती सांगोला पोलिसांकडून मिळाली आहे.