नाझरा गावचे रहिवासी व पेशाने प्राथमिक शिक्षक असणाऱ्या फारूक एस. काझी यांना व्यास क्रियेशन्स, पुणे द्वारा दिला जाणारा ‘बालसाहित्यकार इंदिरा अत्रे पुरस्कार’ घोषित झाला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांनी आपल्या मातोश्री इंदिरा अत्रे यांच्या नावे सुरू केला आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार यावर्षी फारूक एस. काझी यांच्या ‘जादुई दरवाजे’ या राजहंस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या कथासंग्रहाला घोषित झाला आहे.
फारूक काझी एक उपक्रमशील शिक्षक तर आहेतच तसेच ते मुलांसाठी लिहिणारे लेखक ही आहेत. कमी कालावधीत त्यांनी मराठी बालसाहित्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘जादुई दरवाजे’ या पुस्तकाला याआधी कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड-मय पुरस्कार, अ. भा. बालकुमार साहित्य संस्था, पुणेचा ‘वा. गो. आपटे उत्कृष्ट कथासंग्रह राज्यस्तरीय पुरस्कार’ मिळाला असून हा तिसरा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला आहे. रोख रक्कम, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 29 ऑगस्टला पुण्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
स्वत:ची स्वतंत्र लेखनशैली असणाऱ्या फारूक एस. काझी यांची ‘चुटकीचं जग’ ही कादंबरी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या एम. ए. मराठी (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या गोगटे कॉलेज, रत्नागिरी (स्वायत्त) च्या पदवी अभ्यासक्रमात ‘रोजा’ ही त्यांची कथा समाविष्ट झालेली आहे. शिक्षक व लेखक म्हणून त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आजवर त्यांची दहाहून अधिक पुस्तके प्रकाशित असून वीसहून अधिक पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला आहे. तसेच याआधी इयत्ता दुसरीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात दोनवेळा त्यांच्या पाठांचा समावेश झालेला आहे. मराठी भाषा व बालसाहित्य हे त्यांचे आवडते अभ्यासविषय आहेत.