सांगोला तालुका लोणारी समाजसेवा संघाच्या वतीने विविध मागण्यासाठी सांगोल्यात विराट मोर्चाचे प्रदर्शन करीत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. सांगोला शहरांमध्ये लोणारी समाज रत्न पितामह विष्णुपंत दादरे यांचे स्मारक व्हावे, विष्णुपंत दादरे आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे, सांगोला नगर परिषद हद्दीत आरक्षित पाच गुंठे जागा मिळावी व तेथे समाज भवन उभे व्हावे, मुंबई येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींकरिता वस्तीग्रह व अभ्यासिका असावी या प्रमुख मागण्यांसाठी लोणारी समाजाच्या हजारो समाज बांधवांसह विराट जनसमुदायाने आपले शक्ती प्रदर्शन करीत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी संपूर्ण सांगोला शहरातून जणू काही गुलाबी वादळ अवतरल्याचा भास निर्माण झाला होता.
या आंदोलनाकरिता सांगोला तालुका लोणारी समाजसेवा संघाचे अध्यक्ष संतोष करांडे, प्राध्यापक दत्ता नरळे व बाबासाहेब खांडेकर हे या लोणारी समाजाच्या मागण्याकरिता बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. सुरुवातीस महात्मा फुले चौकातून या विराट मोर्चास सुरुवात झाली. महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे मार्गस्थ झाला. छत्रपती शिवाजी महाराज, पंडित जवाहरलाल नेहरू, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सांगोला तहसील कार्यालयासमोर आंदोलनकर्ते दाखल झाले, या ठिकाणी या मोर्चाचे विराट सभेमध्ये रूपांतर झाले. आपल्या आंदोलनाची भूमिका बजावताना उपोषण करते आंदोलक संतोष करांडे यांनी आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसून बेमुदत उपोषण कायम सुरू राहील असा ठाम निर्धार करून आंदोलनावर ठाम असल्याचे मत व्यक्त केले.

प्रास्ताविकामध्ये संघटनेचे प्रवक्ते प्राध्यापक अनिल नवत्रे यांनी आपल्या आक्रमक शैलीत शासन व प्रशासनास धारेवर धरीत लोणारी समाजाचे इतिहासातील योगदान स्पष्ट करताना जर शासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला, याप्रसंगी नवनाथ रानगट पंढरपूर, विजू प्रधाने सोलापूर, डॉक्टर सुदर्शन घेरडे,सागर गोडसे, मधुकर हेटकळे, हरिभाऊ पाटसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून या मागण्या कशा रास्त आहेत हे पटवून दिले.
लोणारी समाजाच्या या आंदोलनात सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिलाव समाजाच्या मागण्या साठी प्रयत्न करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले समाजाच्या ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थळे आपले मनोगत व्यक्त करून आंदोलनास पाठिंबा दर्शवला. सदर आंदोलनात विविध पक्षांनी आपला पाठिंबा दिला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते डॉक्टर पियुष साळुंखे पाटील यांनी लोणारी समाज व साळुंखे पाटील परिवाराच्या नात्यास उजाळा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व साळुंखे पाटील परिवार या आंदोलनात तन मन धनाने पाठीशी राहील असे अभिवचन दिले.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या आंदोलनास उपस्थित राहून समाजाबरोबर रस्त्यावर उतरून खांद्यास खांदा देऊन मागण्या मान्य होईपर्यंत साथ देणार असल्याचे वचन दिले. भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी आंदोलन स्थळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती केली. आरपीआय तालुका अध्यक्ष खंडू सातपुते यांनीही पाठिंबा देत आपलं मनोगत व्यक्त केले. उल्हास धायगुडे, तानाजी काका पाटील, अनिल खडतरे, आनंदा माने, ऍड. सचिन देशमुख, संतोष देवकते यांनीही पाठिंबा देत आपले मनोगत व्यक्त केले.
भाजपा आम. गोपीचंद पडळकर यांनी आंदोलकांशी सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे यांच्याशी मंत्रालयातून भ्रमणध्वनी वरून संपर्क करून देत आठ दिवसात हा प्रश्न निकाली काढण्याचा विश्वास दिला. परंतु लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करते उपोषणावर ठाम असल्याचा आंदोलनकर्त्यांनी निर्धार केला. अध्यक्ष समारोप मान तालुका भाजपा अध्यक्षीय समारोप शिवाजीराव शिंदे यांनी केला. तर सूत्रसंचालन वैष्णव हेटकळे यांनी केले.