*रिमझिम पावसात ही क्रीडांगणावर विद्यार्थ्यांचा उत्साह*; *नाझरा विद्यामंदिर मध्ये शिक्षण सप्तांहअंतर्गत क्रीडा महोत्सव साजरा*

नाझरा(वार्ताहर)शिक्षण हक्क कायदा 2020 या संकल्पनेला चार वर्षे पूर्ण झाले.त्याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभर व महाराष्ट्रभर सुरू आहे. नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये सुद्धा क्रीडा महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्या हस्ते व प्रा. नारायण पाटील प्रा. महेश विभुते, प्रा. युवराज लोहार प्रा. मोहन भोसले ,ग्रंथपाल दत्तात्रय जाधव यांच्या उपस्थितीत क्रीडांगणाचे पूजन करून या महोत्सवात सुरुवात झाली.यावेळी योगासनाचे विविध प्रकार व क्रीडा परिपाठ संपन्न झाला. त्यानंतर देशी खेळाचे महत्व, देशी खेळ आपल्या आरोग्यास कशा पद्धतीने सुदृढ ठेवतात त्याचबरोबर देशी खेळामुळे आपल्याला पुढील आयुष्यात कोणकोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात याबाबत क्रीडाशिक्षक स्वप्निल सासणे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. दुपारच्या सत्रात इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लिंबू चमचा या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
मैदानाची आखणी कशा पद्धतीने करावी याचे प्रात्यक्षिक क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दाखवले. त्यानंतर नववी,दहावी व अकरावी, बारावी साठी कबड्डी व खो-खो हे देशी खेळ मैदानावर प्रचंड उत्साहात खेळण्यात आले. त्याबरोबरच बुद्धिबळ या खेळाचे आयोजन ही एका वर्गामध्ये करण्यात आले होते.या सर्व खेळांना विद्यार्थ्यांनी रिमझिम पावसातही प्रचंड उत्साह दाखवला.
सदर क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्राचार्य बी एस माने सर पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक स्वप्निल सासणे मारुती सरगर व लक्ष्मी कुकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.