नाझरा (वार्ताहर):- रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विविध प्रकारच्या प्रश्नांनी आपल्याला घेरलेले असते. त्या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचता पोचता आपली रोज दमछाक होत असते. प्रत्येकाची यशस्वी होण्यासाठीची धडपड निश्चितपणे त्याला तणावाकडे घेऊन जात आहे अशा तणावातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना सातत्याने दूर केले पाहिजे.नेहमी सकारात्मक विचार करत राहिला तर निश्चितपणे यश आपल्या जवळ येईल. आपल्याला जीवनात आनंदी,उत्साही व आरोग्यमय राहायचे असेल तर सकारात्मकता हीच आनंदी जगण्याची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते संतोष शिरसीकर यांनी केले.
नाझरा विद्या मंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे धनवर्धन वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या तणाव मुक्ती कार्यक्रमांतर्गत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धनवर्धन ट्वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालिका निर्मला कोळवणकर प्राचार्य बिभीषण माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्यासह धनवर्धनचा सहकारी वर्ग उपस्थित होता.
पुढे बोलताना शिरसीकर म्हणाले की जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर भूतकाळाला सोडून द्या.,भविष्याचा कानोसा घेत वर्तमान काळ आनंदित जगता आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे.जगण्याला समजून घेत इतरांच्या जगण्यालाही आनंदित करता आलं पाहिजे. शालेय जीवनापासूनच आपल्यामध्ये बचतीची सवय लागली तर आपल्या उतरत्या वयामध्ये या बचतीचा निश्चितपणे आपल्याला फायदा होतो. धनवर्धनच्या संचालिका निर्मला कोळवणकर यांनी आपले विचार व्यक्त करताना आरोग्याबरोबर युवकांमध्ये बचतीच्या सवयी लागणं अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.नाझरा विद्या मंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बिभीषण माने यांनी आपल्या प्रास्ताविकातून ताण-तणावात असणाऱ्या आजच्या धक्का धक्कीच्या च्या जीवनात तणावमुक्त राहणं आणि त्यातून आपल्या जीवनाचा विकास साधने हे किती महत्त्वाचे आहे याबाबत विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास नववी ते बारावीचे विद्यार्थी तसेच परिसरातील असंख्य पालक उपस्थित होते. तणाव मुक्तीच्या या विशेष कार्यक्रमाचे पालकांकडून स्वागत करण्यात आले. अनेक पालकांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार प्रा. मोहन भोसले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक व सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले.