कोळा येथील श्री गुरुदत्त महाराज मोफत वाचनालयात वाचन प्रेमी सौभाग्यवतीचा सन्मान सोहळा संपन्न

कोळा (वार्ताहर):-सांगोला तालुक्यातील कोळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सौ नंदाताई हिंदुराव मोरे यांचा सत्कार प्राथमिक शिक्षिका सौ पुष्पाताई लोटके यांनी सत्कार केला तर हिंदुराव मोरे यांचा फुल पोशाख देऊन उपसरपंच डॉ.सादिक पटेल यांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा सन्मान केला.
यावेळी सत्कारमूर्ती नंदाताई मोरे म्हणाल्या, मी 1991 पासून आज वयाच्या साठाव्या वर्षाही वाचन करण्याचा माझा अखंड उपक्रम चालू आहे आज पर्यंत सुमारे 2 हजारापेक्षा जास्त पुस्तकाचे मी वाचन केले आहे. सामान्य कुटुंबातील मी असून माझा वाचनालयाने केलेला सत्कार संपूर्ण आंबेडकर अनुयायी व दलित बांधवांचा आहे. वाचनालयाचे कार्य समाजाला प्रेरणादायी असुन माझे पती हिंदुराव मोरे यांची मला वाचनासाठी मोलाची साथ दिली मला प्रोत्साहन दिले.
ग्रंथपाल अनिता कुलकर्णी यांनी मला हवी असलेली पुस्तके वेळोवेळी उपलब्ध करून दिली. कोणतीही वर्गणी न घेता वाचण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन दिले त्यांच्या सेवेला मी नमस्कार करते. समाजाच्या कुटुंबाच्या गावाच्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन करणे गरजेचे आहे त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील, टेन्शन पासून तुम्हाला मुक्ती मिळेल बुद्धीचा विकास होईल असे सांगत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन जीवनात आपण यशस्वी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी ग्रंथपाल अनिता कुलकर्णी यांनी दोन मासिके नंदाताई मोरे यांना देऊन त्यांना पेढा भरवून आनंद साजरा केला. या कार्यक्रमासाठी कोळा आदर्श संस्थेचे मॅनेजर विलास सरगर, कुशाबा कोळेकर, दत्ता माने, पत्रकार जगदीश कुलकर्णी, श्रीमती छाया आलदर, सौ सुनीता चव्हाण, तायरा आतार, मनीषा पोरे आदी उपस्थित होते.