दोन गरजू कुटुंबाना निवाऱ्यासाठी पाल भेट देत वाढदिवस साजरा; आपुलकी सदस्य अजयकुमार बाबर यांचा स्तुत्य उपक्रम!

सांगोला ( प्रतिनिधी )- वादळी वाऱ्याने राहत्या निवाऱ्याचे पाल फाटल्याने व प्रपंच उघड्यावर आल्यामुळे आपुलकी सदस्य अजयकुमार बाबर गुरुजी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन गरजू कुटुंबाना शनिवारी पाल भेट देत आपुलकीचा निवारा दिला.
मिरज रोडवर राहणाऱ्या, भटकंती करणाऱ्या व भंगार जमा करून उदरनिर्वाह करणाऱ्या युवराज इंगोले परिवार यांचे रहात असलेले निवाऱ्याचे पाल गुरुवारी वादळी वाऱ्याने फाटल्यामुळे प्रपंच उघड्यावर आला. लहान लहान चार मुलं असलेल्या या कुटुंबाला निवाऱ्याची गरज होती. ही गरज ओळखून अजयकुमार बाबर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च टाळून आपुलकी प्रतिष्ठान सांगोलाच्या माध्यमातून युवराज इंगोले यांच्या कुटुंबीयांना २ पाल शनिवारी भेट दिले. तसेच लहान मुलांना खाऊ दिला. यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, अरविंद केदार, अजयकुमार बाबर, दत्तात्रय खटकाळे, प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, सुरेशकाका चौगुले, अण्णासाहेब मदने गुरुजी, प्रा. संजय मुंढे, श्रीकांत देशपांडे, वसंत सुपेकर, अच्युत फुले, जितेंद्र बोत्रे गुरुजी, रविंद्र कदम आदी उपस्थित होते.