सांगोला शहरात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे भव्य स्मारक आणि भवन उभारणीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा; दिपकआबांची उपमुख्यमंत्री अजितदादांकडे आग्रही मागणी

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सरकारच्या विरोधात सशस्त्र बंड करणारे आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान आहे. त्यांचे कार्य आणि त्यांचा दैदीप्यमान इतिहास तरुण पिढीला प्रेरणादायी आहे म्हणून सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे भव्य स्मारक आणि भवन व्हावे यासाठी राज्य सरकारने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सांगोला शहर आणि तालुक्यात तसेच प्रामुख्याने माढा लोकसभा मतदारसंघात रामोशी समाज मोठ्या प्रमाणात आहे. गेली अनेक वर्षे हा समाज सांगोला शहर आणि तालुक्यात गुण्या गोविंदाने नांदत आहे. सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्या प्रेरणादायी महापुरुषाचे भव्य स्मारक आणि राजे उमाजी नाईक भवन व्हावे ही सांगोला शहर आणि तालुक्यातील तमाम समाज बांधवांची अनेक वर्षांची मागणी आहे. भारतीय स्वतंत्र लढ्यात इंग्रजांच्या विरोधात सर्वात प्रथम शस्त्र उपसणाऱ्या राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकापासून आणि दैदीप्यमान इतिहासापासून सांगोला तालुक्यातील तमाम तरुणाईला प्रेरणा मिळावी यासाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी राजे उमाजी नाईक यांचे भव्य स्मारकाने भवन व्हावे. यासाठी राज्य सरकारने लवकरच लवकर ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी यावेळी माजी आमदार दिपकआबांनी राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली यावेळी अजितदादांनी दिपकआबांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर सांगोला शहरात राजे उमाजी नाईक यांचे स्मारक आणि भवन उभारणीसाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.