देशमुख कुटुंबिय चारा छावणी चालकांच्या सदैव पाठिशी – डॉ.अनिकेत देशमुख; छावणी चालकांच्या आंदोलनास डॉ.अनिकेत देशमुख यांची भेट

सांगोला (प्रतिनिधी):-मुंबई येथे नुकतीच मी आणि डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांचे प्रलंबीत अनुदान अदा करणे विषयी सकारात्मक चर्चा केली आहे. सदरचे प्रलंबीत अनुदान लवकरात लवकर देण्याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली असून चारा छावणी चालकांच्या पाठिशी देशमुख कुटुंबिय सदैव राहणार असून लवकरात लवकर शासनाने चारा छावणी चालकांचे प्रलंबीत अनुदान अदा करावे,अशी मागणी डॉ.अनिकेत देशमुख यांनी केली.
2018-19 च्या चारा छावणीची बिले मिळाली नसल्यामुळे सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालक बुधवार दि.26 जुलै पासून सांगोला तहसील कार्यालयासमोर जनावरांसह आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलनास शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रिय युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी भेट देवून पाठिंबा दिला.
सन 2018-19 च्या दुष्काळात पशुधन जगविण्यासाठी पुढे येवून चारा छावण्या शासनाच्या नियमानुसार योग्य व चांगल्या प्रकारे चालविल्या होत्या. प्रत्येक छावणीवर एक अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक छावणीवर राहुन देखरेख करत होते. त्याचप्रमाणे चारा, पाणी तपासणे, जनावरे मोजणे व त्यांच्या सहीने तहसील कार्यालयाला जनावरांच्या संख्येचा अहवाल दिला जात होता. आठवडयातून एक वेळा छावणी समितीच्या सर्व सदस्यांच्या सहीने तहसील कार्यालयास जनावरांच्या संख्येचा अहवाल दिला जात होता. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करुन शासनाने छावणी चालकांचे प्रलंबीत अनुदान तात्काळ अदा करावे, अशी मागणी डॉ.अनिकेत देशमुख यांनी करुन आंदोलनास पाठिंबा दिला.