फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूलने शैक्षणिक सहल आयोजित केली होती. फॅबटेक पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील यांच्या प्रेरणेतून शैक्षणिक सहल आनंदात व उत्साहात पार पडली. मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी इयत्ता सहावी ते दहावी या गटाची शैक्षणिक सहल सोलापूर विज्ञान सेंटर व नळदुर्ग किल्ला येथे आयोजित केली होती. सकाळी सात वाजता सहलीला जाणाऱ्या गाड्यांची पूजा पालकांकडून करण्यात आली व सहलीसाठी प्रस्थान झाले.
नळदुर्ग किल्ला हा मराठवाड्यातील महत्वाचा भुईकोट किल्ला असून मध्ययुगीन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. प्रचलित जनश्रुतीनुसार नळराजाने हा किल्ला बांधला म्हणून या स्थानाचे व किल्ल्याचे नांव नळदुर्ग असे रुढ झाले.हा मूळ किल्ला कल्याणीच्या चालुक्य काळात बांधण्यात आला असल्याची नोंद आहे. त्यानंतर बहामनी काळात इ.स. १३५१ ते इ.स.१४८० मध्ये तसेच आदिलशाही कालखंडात इ.स. १५५८ मध्ये या किल्ल्यास दगडी चिऱ्याची मजबूत तटबंदी बांधण्यात आली. इब्राहिम आदिलशहा दुसरा यांच्या काळात इ.स.१६१३ मध्ये बोरी नदीवर बंधारा बांधून पाणी महालाचे बांधकाम करण्यात आले. पाणी महाल तत्कालीन स्थापत्यशैली व अभियांत्रीकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. किल्ल्यात प्रवेश करण्याकरिता “हुलमुख दरवाजा” हे प्रमुख प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या संरक्षणार्थ सभोवताली तटबंदीस असून तटबंदी भक्कम असे ११४ बुरुज़ आहेत. यात परंडा, उपळी, संग्राम आणि नवबुरुज इत्यादी मुख्य बुरुज आहेत. उपळी बुरुज हे किल्ल्यातील सर्वांत उंच ठिकाण आहे. यातील काही बुरुजांवर आजही तोफा आहेत. यात “हत्तीतोफ” आणि “मगरतोफ” या प्रमुख तोफा आहेत. किल्ल्याच्या आतील भागात अंबरखाना, मुन्सिफकोर्ट, मशिद, बारादरी, पाणीमहल, रंगमहल, हत्ती तलाव व मछलीतट इ. तत्कालीन वास्तूंचे अवशेष आहेत. नळदुर्ग किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे राज्यसंरक्षित स्मारक आहे. ही सर्व माहिती विद्यार्थ्यांनी अतिशय उत्सुकतेने घेतली. त्यानंतर सोलापूर विज्ञान सेंटर हे पाहण्यात आले. तिथे टेक्स्टाईल,संगणक कक्ष, तारा मंडळ व थ्रीडी व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. टेक्स्टाईल मध्ये( तंतू ते तयार कपडे) कापसाच्या निर्मितीपासून ते वेगवेगळ्या प्रकारची कापड निर्मिती कशा प्रकारची होते हे विद्यार्थ्यांनी पाहिले, संगणक कक्षामध्ये रिंगांचा दृष्टीभ्रम, वर सरकणारी ज्योत, तरंगणारा चेंडू, रंगणारी तबकडी, न्यूटनचा झोका असे अनेक प्रयोग पाहिले,तर तारा मंडळ मध्ये ध्रुव हा सर्वात मोठा तारा असून आकाशातील चांदण्या फिरत नसून पृथ्वी फिरत असते तसेच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ग्रहांची तसेच नक्षत्रांची माहिती मिळाली.
सहलीसाठी फॅबटेक संस्थेचे चेअरमन माननीय श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील, ए.ओ.वर्षा कोळेकर, सुपरवायझर वनिता बाबर यांचे मार्गदर्शन मिळाले. सहल नियोजन प्रमुख श्री.निसार इनामदार, श्री.अभिनंदन टाकाळे, किरण कोडक सौ. शितल बिडवे ,सौ.कोमल पवार, सौ. मुक्ता सिदबट्टी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सहलीचे नियोजन केले व उत्कृष्टरित्या सहल पार पडली.