आघाडीत उमेदवार ठरवण्याचा अधिकार ‘या’ तीन नेत्यांना; शरद पवार यांनी सांगितली रणनीती
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आम्ही तीन जणांची समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेचे संजय राऊत या कमिटीत असतील.
हे तिन्ही नेते कुणाला उमेदवारी द्यायची हे ठरवतील. येत्या दहा दिवसात त्यांचा अहवाल ही समिती देणार आहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली आहे. विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरच्या आत पार पडतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीची निवडणूक रणनीतीच स्पष्ट केली. योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आम्ही तीन लोकांची कमिटी केली आहे. जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊत या तीन नेत्यांना निर्णय घेण्याचा, शिफारस करण्याचे अधिकार दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात जाऊन ही समिती सर्व्हे करणार आहे. जे लोक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याबाबतचा लोकांचा कल जाणून घेणार आहेत. जो ओरिजिनल इच्छुक आहे, त्याला काही विचारलं जाणार नाही. तर गावातील सामान्य लोकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. तसेच दूध संस्था, सहकारी संस्था आणि इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊनच उमेदवार ठरवला जाणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.