सूर्योदय परिवाराच्या वतीने वैजिनाथ घोंगडे यांचा सन्मान

.महाराष्ट्र राज्य पातळीवरील वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने दिला जाणारा जलसंधारण पुरस्कार मानगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजीनाथ घोंगडे यांना नुकताच प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांचा सूर्योदय उद्योग समूह व एलकेपी मल्टीस्टेट परिवार यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सांगोला शहरामधील महात्मा फुले चौकातील सूर्योदय अर्बन या संस्थेच्या कार्यालयात सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले, सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ. बंडोपंत लवटे, सहसंस्थापक जगन्नाथ भगत सर, एल के पी मल्टीस्टेटचे व्हॉ. चेअरमन सुभाष दिघे सर, माणगंगा संस्थेचे सदस्य प्रा. अशोकराव शिंदे , संतोष इंगवले यांचे सह विविध मान्यवरांची व कर्मचारी वृंदांची उपस्थिती होती. वित्तीय संस्था , उद्योग आणि व्यवसायांबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान करण्याची सूर्योदय उद्योग समूहाची अनेक वर्षापासूनची परंपरा आहे.
ओढे, नदी, नाले तसेच बंधारे यातील काटेरी झुडपे व गाळ बाजूला करून या जलरूपांची साठवण क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने वैजीनाथ घोंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले काम प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. हजाराहून अधिक कुटुंबांना काम देणाऱ्या एवढ्या मोठ्या उद्योग समूहाने माझा सन्मान केल्यामुळे आमच्या कार्याला अधिक बळ मिळत असल्याच्या भावना यावेळी सत्कारमूर्ती घोंगडे यांनी बोलून दाखवल्या.