सांगोला विद्यामंदिर इयत्ता अकरावी पालक सभा संपन्न

निश्चित ध्येय हेच यशाचे दार- प्राचार्य भीमाशंकर पैलवान*
सांगोला (प्रतिनिधी): पाल्याच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये शिक्षकांबरोबरच पालकांचेही योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. स्पर्धेच्या युगात कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित करून ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे समर्पित होणे गरजेचे आहे. तुमच्या परिश्रमावर यश अवलंबून असते. ध्येय निश्चित करून प्रचंड मेहनत करा. धवल यश मिळेल तेच खरे यशाचे दार आहे असे प्रतिपादन प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी केले.सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या द्वितीय सत्रातील इ.११ वी कला,वाणिज्य व शास्त्र शाखेतील पालकांच्या साठी आयोजित केलेल्या पालक- शिक्षक सभेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. गंगाधर घोंगडे,उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे,पालक-शिक्षक संघाच्या सदस्या सौ.सुलक्षणी गुळमिरे,पालक प्रतिनिधी इकबाल पटेल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकात चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र परीक्षा निकाल आढावा,एम.एच.टी.सी.ई.टी. वर्गाचे मार्गदर्शन व शैक्षणिक वर्ष २०२३-२४ इ.१२ वी च्या वर्गांच्या पूर्व तयारीच्या नियोजना विषयीची माहिती उपस्थित पालकांना दिली.यावेळी ज्युनिअर कॉलेज मधील प्रा.सौ.अश्विनी जालगिरे,प्रा.प्रसाद खडतरे ,प्रा.सौ.माधुरी पैलवान व प्रा.जालिंदर मिसाळ यांनी विविध शाखांविषयी मनोगते व्यक्त करून इ.१२ वी नंतर होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा विषयीची माहिती उपस्थित पालकांना दिली. सभेस उपस्थित पालकांपैकी राजेश गायकवाड,राजेंद्र भोरे व सौ. रेश्मा जगताप यांनी मनोगते व्यक्त करून काही उपयुक्त सूचना मांडल्या.
पुढे बोलताना प्राचार्य पैलवान म्हणाले,शैक्षणिक उद्दिष्ट्य साध्य होण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यामधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्याचा कल ओळखणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील कथा, कादंबऱ्या,क्रमिक,संदर्भ व विविध स्पर्धा पुस्तकांचा लाभ घेऊन वाचन शक्ती वाढवावी.आरोग्याकडे लक्ष देत विद्यार्थ्यांनी आहाराचे नियोजन करून अभ्यासाची बैठक वाढवावी.कुटुंबातील सुसंवाद वाढवून इलेक्ट्रॉनिक मिडिआचा आवश्यक तेवढाच वापर करावा,असा मौलिक सल्ला ही त्यांनी उपस्थितांना दिला.सदर सभेसाठी सुज्ञ पालक, ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कु.अर्चना कटरे यांनी केले तर प्रा.विजयकुमार सासणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.