सांगोला/प्रतिनिधी –सांगोला शहरातील देवांग कोष्टी समाजाच्या वतीने यंदा गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा फक्त कोष्टी समाजातील महिलाभगिनींसाठी मर्यादित ठेवण्यात आल्या होत्या. महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी व त्यांचा आत्मविश्वास वाढावा या हेतूने समाजाकडून हा उपक्रम राबविण्यात आला.
या स्पर्धेचे परीक्षण महालक्ष्मी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी व तिसऱ्या दिवशी करण्यात आले. सजावटीसाठी कोणताही विषय निश्चित करण्यात आला नव्हता. त्यामुळे महिलांना आपल्या कल्पकतेनुसार सजावट करण्याची मुभा देण्यात आली होती. विविध कल्पक व देखण्या सजावटीनं परीक्षकांची मनं जिंकली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी पूजा काकासाहेब भागवत हिने पटकावला. द्वितीय क्रमांक सौ. रेश्मा प्रशांत दिवटे यांना मिळाला. तर तृतीय क्रमांक सौ. गीता विवेक दौंडे आणि सौ. निशा जयराम दौंडे यांना संयुक्तरीत्या बहाल करण्यात आला. उत्तेजनार्थ पारितोषिके सौ. वर्षा अनिल लाटणे आणि सौ. दिपाली महेश म्हेत्रे यांनी मिळवली.
या पारितोषिक वितरणाचा समारंभ दिनांक ८ सप्टेंबर रोजी कोष्टी गल्लीतील चौंडेश्वरी मंदिरात सायंकाळी पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अवधूत कुमठेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष राजकुमार दौंडे, सचिव अनिल लाटणे सर, संचालक मंडळ सदस्य, माजी नगरसेवक मा. दिपकराव चोथे, माजी सचिव मा. औदुंबर सपाटे तसेच महिला मंच पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात विजेत्या महिलांना बक्षिसे व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. महिलांच्या सादर केलेल्या कलात्मक व सृजनशील सजावटींचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले. समाजातील महिलांच्या सहभागामुळे उत्सवाचे वैभव अधिक खुलून आले असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. शुभांगी पतंगे, सौ. कविता पाटील मॅडम व सौ. सरला खाडे मॅडम यांनी काम पाहिले. त्यांचे परिश्रम व योगदानाबद्दल समाजाकडून विशेष आभार व्यक्त करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांना आपली कला सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले असून समाजात एकोपा वाढविण्यास मदत झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.