नंदेश्वर (प्रतिनिधी) -मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवार दिनांक ८ ऑक्टोंबर रोजी पहाटे चार वाजता काकडा आरती होऊन पाच वाजता नंदेश्वर नगरीमधुन प्रभातफेरी निघून पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात होणार आहे. ठिक दहा वाजता मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते श्री दासबोध व श्री बाळकृष्ण चरित्रामृत ग्रंथाचे पारायण व विणापुजन होणार आहे.
दिनांक ९ ऑक्टोबर रोजी संगीत भजन,प्रवचन,किर्तनसेवा व पारमार्थिक व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे.दिनांक १० ऑक्टोंबर रोजी कर्नाटक येथील इंचगिरी येथुन नामज्योत आणण्यासाठी युवक इंचगिरीकडे रवाना होतील.दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी ठिक चार वाजता समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली यांच्या पालखी व रथाची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे.
या मिरवणुकीत प्रामुख्याने सर्वप्रथम नाचणारा घोडा,हलगीवाले,बॅन्ड पथक,सनई-वादक,नाचणारा मानवरूपी मोर,साहसी खेळ, लेझीम पथक,झेंडेकरी,टाळकरी, विणेकरी,मृदंगवादक व शेवटी बाळकृष्ण माऊलींची पालखी व रथ अशी सवाद्य मिरवणूक निघेल व रात्री हरीजागर होईल.
दिनांक १२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ठिक सात वाजता श्री ची पूजा होईल नऊ वाजता मुंबई, व कर्नाटक येथील महिला भजनी मंडळांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होईल.ठिक अकरा वाजता समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांचे प्रवचन होईल व दुपारी ठिक बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादानंतर या पुण्यतिथी सोहळ्याची उत्साहात सांगता होईल. या सोहळ्यासाठी कर्नाटक,आंध्रप्रदेश,गोवा व मुंबईतून भाविक-भक्त मोठ्या प्रमाणात नंदेश्वर येथे येत असतात. बाळकृष्ण माऊली पुण्यतिथी सोहळा म्हटले की, सर्व पक्षाचे नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सासुरवाशीनी-माहेरवाशीनी,पै-पाहुणे या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त बाळकृष्ण माऊलींच्या मंदिरात येत असतात.परगावहून येणाऱ्या भाविक-भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून देवसागर साधक ट्रस्टकडून व नंदेश्वर ग्रामपंचायतीकडून सर्व प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड यांनी दिली.