आमदार शहाजीबापू पाटील यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्याकडे केलेल्या मागणीला ऐतिहासिक यश

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य, गोरगरीब घटकासाठी खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केल्याचे सांगितले .आमदार शहाजीबापू पाटील यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगून होलार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत निर्णय घेण्याची मागणी केली.
या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील होलार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू अशी घोषणा केली . सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होलार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. या निर्णयामुळे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागणीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
होलार समाज बांधवांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी वारंवार मागणी केली होती. या मागणीची पूर्तता करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी व पाठपुरावा केला होता. होलार समाजातील शिष्टमंडळामध्ये अकलूजचे नंदकुमार केंगार ,कमलापूरचे दीपक ऐवळे, गौडवाडीचे राजू गुळीग व चोपडीचे एल.बी.केंगार यांनी यासंदर्भात आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. या मागणीला खऱ्या अर्थाने सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मूर्त स्वरूप आले.
होलार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक क्षण आहे .होलार समाज्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात असून राज्यातील होलार समाज बांधवातून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे .
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यातील वंचित व गोरगरीब घटकांसाठी काम करण्याचा निर्णय घेऊन अनेक कामे मार्गी लावली आहेत. राज्यामध्ये महायुतीचे सरकार असून या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना आत्मनिर्भर केले आहे. महिलांच्या उन्नतीसाठी, व प्रगतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेतून वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. तसेच एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. यासह अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील सर्वच घटकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे.