भारतीय ज्ञान परंपरा हि जगाला मिळालेली अनमोल देणगी – डॉ.प्रभाकर कोळेकर

सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी इतिहास विभागामार्फत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष व्याख्याते म्हणून डॉ.प्रभाकर कोळेकर विभागप्रमुख, प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांनी ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ.सदाशिव देवकर यांनी केले, तर आभार डॉ.महेश घाडगे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.भाग्यश्री पाटील यांनी केले.
डॉ.प्रभाकर कोळेकर याप्रसंगी बोलताना म्हणाले, आज ज्या कालखंडातून देश पुढे निघाला आहे, त्या वेळी जगाला भारत जाणून घेण्याची एक विशेष उत्सुकता आहे. अशा या देशाच्या भूतकाळाविषयी, या देशाच्या ज्ञान परंपरांचे आपल्याला किती ज्ञान आहे या गोष्टी विद्यार्थ्यांनी मुळातून समजून घेणे आवश्यक आहे. १८३५ रोजी इंग्रज शिक्षण तज्ज्ञ लॉर्ड मेकॉले यांनी ब्रिटिश संसदेपुढे केलेल्या भाषणात सांगितले होते, की भारताच्या भूमीवर आपण तोपर्यंत राज्य करू शकणार नाही, जोपर्यंत आपण भारतीयांच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा मोडून काढणार नाही. आज भारतातील कितीतरी अग्रगण्य आयआयटीमधून, विद्यापीठांतून भारतीय ज्ञान परंपरेचे अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. भारतीय ज्ञान परंपरेतील कितीतरी गोष्टी आपण एकतर सहजपणे स्वीकारतो किंवा अभ्यासाविना नाकारतो. जे जे पुरातन आहे, ते ते चांगलेच आहे, जे जे संस्कृतमध्ये लिहिले आहे, म्हणून ते स्वीकारलेच पाहिजे असा आग्रह निश्चितच असू नये. भारताने जगाला शून्याची देणगी दिली, आयुर्वेदासारखी ‘निसर्ग केंद्रित’ आरोग्यप्रणाली दिली, प्राचीन धातुशास्त्राचा चमत्कार म्हणून प्रसिद्ध असलेला दिल्लीचा लोहस्तंभ, स्थापत्यशास्त्राचा अद्भुत चमत्कार म्हणून ज्याच्याकडे पाहावे लागेल प्राचीन हेमाडपंती मंदिरे, अजंठा आणि वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी आणि अपौरुषेय असे चार वेद, अठरा पुराणे, उपनिषदे, षड्दर्शने, रामायण, महाभारतादी महाकाव्ये, चौदा विद्या, चौसष्ठ कला, जगप्रसिद्ध बौद्ध धर्म, ‘अस्तेय’, ‘ब्रह्मचर्य’ आणि ‘अपरिग्रहा’ची शिकवण देणारा जैन धर्म, जडी-बुटी आणि पारंपरिक ज्ञानाधारे अशक्यप्राय व्याधींवर यशस्वी उपचार करणारे मुस्लिम हकीम-वैद्य, योग साधना, संगीत-नाट्य आणि भारतीय कलापरंपरा, यांच्याशी एकरूप होण्याची एक चांगली संधी भारतीय ज्ञान परंपरेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना लाभली आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, भारतीय ज्ञान परंपरा’ ही केवळ मानव जातीचाच विचार करीत नाही, तर ती चराचर सृष्टीचा, इतर प्राणीमात्र, सजीव, निर्जीवांचाही विचार करणारी आहे. सगुण साकार आणि निर्गुण निराकार, व्यक्त आणि अव्यक्त ब्रह्माचा विचार करणारी ही ज्ञान परंपरा आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास ध्येयांचा विचार मांडणारी सर्वांत प्राचीनतम ज्ञान परंपरा आहे. कोणत्याही परकीय संस्कृतीला हीन न लेखता, कोणत्याही संस्कृतीवर, प्रदेशावर आक्रमण न करता, कुणाच्याही श्रद्धेवर घाला न घालता, आस्तिक आणि नास्तिकाचाही (चार्वाक) विचार तितक्याच आदराने करणारी संस्कृती म्हणून, भारतीय ज्ञान परंपरेकडे पाहावे लागेल.
सदरच्या कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ.अर्जुन मासाळ,डॉ.बबन गायकवाड, डॉ.विद्या जाधव, डॉ मच्छिंद्र वेदपाठक, डॉ.नितीन बाबर, प्रा.प्रशांत गोडसे, प्रा.सोनल भुंजे, शिक्षकेत्तर कर्मचारी शंकर माने, बाबासो इंगोले आणि बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.