सांगोला: कोण माघार घेणार आणि कोण निवडणूक रिंगणात राहणार; आज फैसला
विधानसभा निवडणुकीची सांगोल्याची जिल्हा सह राज्यात सगळीकडे चर्चा आहे. सांगोला तालुक्यात अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर या मतदारसंघात एकूण 37 उमेदवारांनी 48 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 32 उमेदवारांची 40 अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. तसेच 5 उमेदवारांचे अर्ज पूर्णतः अवैध ठरवण्यात आलेले आहेत तसेच 3 उमेदवारांनी दोन अर्ज भरले होते त्यापैकी एक अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. छाननीत एकूण 32 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते त्यापैकी 1 उमेदवारांनी अर्ज काढुन घेतल्याने आता 31 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत.
आज 3 वाजेपर्यंत उमेदवारांचे अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे कोण माघार घेणार आणि कोण निवडणूक रिंगणात राहणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
आज निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ही प्रक्रिया पार पडणार आहे. दुपारी 3 नंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.
तालुक्यात महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष व महायुतीने शिवसेना पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील दोन उमेदवारीमुळे बिघाडीची चिन्हे निर्माण झाली आहेत. शेकापच्या देशमुखांसह दोन्ही शिवसेनेच्या तालुक्यातील दोन प्रमुख पाटलांनी शड्डू ठोकल्यामुळे तालुक्यातील राजकारणात यंदा तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. निवडणुकीचे चित्र अस्पष्ट होणार असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सांगोला विधानसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे.