महाराष्ट्र
विद्यामंदिरच्या एस.एस.सी.1998 बॅचचे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न
गुरुजन व शाळेच्या संस्कारातून विद्यार्थ्यांचे जीवन घडते-प्रा.प्रबुद्धचंद्र झपके

सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजने आत्तापर्यंत गुण व संस्कार यातून अनेक विद्यार्थी घडवले. तुम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा वर्षातून एकदा तरी एकत्र येत एकमेकांची विचारपूस करावी, समाजाप्रती असणारी आपली सद्भावना मदतीतून दर्शवावी असे मत मा.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील एस.एस.सी.बॅच 1998 च्या माजी विद्यार्थी आयोजित “शिक्षक कृतज्ञता” समारंभामध्ये अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर माजी प्राचार्य संजीव नाकील सर , सौ.मीरा अंकलगी, मा.नारायण विसापूरे सर , मा.गंगाधर घोंगडे सर , मा.भीमाशंकर पैलवान, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक अब्दुलगणी सय्यद सर , मा.अमर गुळमिरे सर , मा.बबनराव बुंजकर सर , मा.पांडुरंग भुईटे सर , मा.नारायण राऊत, उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद, कोळा विद्यामंदिर हायस्कूलचे पर्यवेक्षक मा.चारुदत्त जगताप सर ,मा.मारुती बोरकर सर , मा उत्तम सोनलकर सर , मा दत्तात्रय देशमुख उपस्थित होते.
माजी प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी सध्याच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात ताणतणावाचे उत्तम व्यवस्थापन करत आरोग्य राखण्याबद्दलचा मोलाचा सल्ला यावेळी आपल्या मनोगतातून दिला.
माजी प्राचार्य संजीव नाकील यांनी आज विद्यार्थ्यांच्या सदिच्छांवरच आम्हा सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचे आरोग्य उत्तम असून तुम्ही सर्वजण जीवनातल्या विविध क्षेत्रात यशस्वी आहात हे पाहून आम्हाला मिळणारा आनंद अवर्णनीय आहे असे उद्गार यावेळी काढले. इयत्ता दहावीच्या वर्गाला अध्यापन करतानाचा विद्यार्थ्यांच्या विशेष मागणीवरून सरांचा “फेमस डायलॉग” यावेळी सरांनी पुन्हा एकदा म्हणताच विद्यार्थ्यांनी आनंदाने साद दिली.
जेवढा जास्त मित्रपरिवार जेवढा जास्त संवाद तेवढे चांगले आरोग्य रहात असल्याबद्दलचे प्रांजळ मत माजी प्राचार्या सौ.मीरा अंकलगी, मा.नारायण विसापूरे सर ,मा.बबनराव बुंजकर सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रशालेचे संस्थापक कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या शुभहस्ते व मान्यवर गुरुजनांच्या उपस्थितीत पुष्पहार समर्पित करत अभिवादन करण्यात आले.दिवंगत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, वर्ग मित्र-मैत्रिणी, सीमेवरील जवान यांचा उल्लेख करत श्रद्धांजली वाहण्यात आली.
उपस्थित सर्व गुरुवर्यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दलचे मानपत्र आणि मानाचा फेटा, पुष्पहार या स्वरूपात सन्मान करण्यात आला.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख सांगत ओळखलेत का सर मला? असा प्रेमळ प्रश्न शिक्षकांना केला. सध्याच्या कार्यक्षेत्रात आम्ही केवळ विद्यामंदिरने आमच्यात रुजवलेल्या संस्कार आणि शिकवणीवरच यशस्वी आहोत अशी प्रांजळ कबुली यावेळी आपल्या मनोगतातून डॉ.पियुषदादा साळुंखे-पाटील, अच्युतराव फुले, सचिन पैलवान, प्रा. ज्ञानेश्वर इंगोले, ॲड.वृषाली चव्हाण-बांदल, स्मिता लोखंडे-कोरवार, रोहिणी ढेकळे यांनी दिली.
सुरुची भोजनाने कार्यक्रमाला रंगत आणली सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या दहावीच्या वर्गातील बेंचवर बसत आपले सहकारी वर्गमित्र-मैत्रिणींची मते सध्या ते कार्यरत असणाऱ्या क्षेत्राविषयीची मते आणि अनुभव काय आहेत ते जाणून घेतले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना ग्रुप फोटोची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम संघटकाची भूमिका पार पाडलेले संतोष महिमकर आणि अभिनंदन गाडे यांचे सर्वांनी कौतुक केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गणेश पाटोळे, प्रवीण अरबळी,डाॅ. सागर कांबळे, सोमनाथ माळी यांच्यासह सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार वैभव कोठावळे सर यांनी मानले.