सर्वांना गुण्यागोविंदाने नांदायचे असेल तर शेकापच्या डॉ.बाबासाहेब देशमुख यांना विजयी करा-जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील

सांगोला:- कोणा उमेदवारासाठी प्रतिष्ठेची, कोणा उमेदवारासाठी अस्मितेची तर कोणा उमेदवाराची शेवटची निवडणूक आहे असे सांगत असले तरी पुढील 40-50 वर्षासाठीची शेतकरी कामगार पक्षाची आपली लढाई या निवडणुकीपासून सुरू होत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता निवडणुकीपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करावे असे आवाहन करत सर्वसामान्य नागरिकांसह सर्व समाज बांधवांना गुण्यागोविंदाने नांदायचे असेल तर शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून निवडणुकीत डॉ.बाबासाहेब देशमुख यांना विजयी करा असे आवाहन संभाजी ब्रिगेड संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रदीप मिसाळ-पाटील यांनी केले.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकासआघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ गुरुवार (दि.7) रोजी बामणी, मांजरी, संगेवाडी, मेथवडे, देवळे येथ गावभेट दौरा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना संभाजी ब्रिगेड संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रदीप मिसाळ पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख, चिटणीस मंडळाचे सदस्य डॉ.भाई अनिकेत देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रदीप मिसाळ पाटील म्हणाले की, मी स्व.आबासाहेबांचा कार्यकर्ता असून जात धर्म न मानणारा कार्यकर्ता आहे. गेल्या चार पिढ्यांपासून शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा खांद्यावर घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे सांगोला तालुक्यात काम करत आहे त्यामुळे नैतिकता आम्हाला कोणी शिकवू नये. तुमच्यासारखे तिकीट मिळवण्यासारखे आज या पक्षात ,संध्याकाळी दुसर्या पक्षात, दिवशी अपक्ष लढतो म्हणायचे आणि तिकट तर दुसरीकडूनच घ्यायचे असे आम्ही करत नाही. तुमची कुवत नसतानासुद्धा स्व.आबासाहेबांनी तुम्हाला सर्वच ठिकाणी सत्तेचा वाटा दिला त्यामुळे आम्ही आबासाहेबांना मदत करतो असे म्हणार्यांनी तुमच्याकडे ताकद होती तर तुम्ही स्वतः उभा राहिला पाहिजे होते असा टोला लगावत तुमच्यापेक्षा रोजंदारीवरची जनता प्रामाणिक आणि जातीवंत आहे असे सांगत सर्वसामान्य जनतेने डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या शिट्टी या चिन्हा समोरील यांचे भाषण बटन दाबून बहुमताने विजयी करा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सर्वसामान्य जनतेचे गेल्या पाच वर्षात फसवणूक झाली आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकर्यांचे कोणतेही प्रश्न गेल्या 5 वर्षात सुटले नाहीत त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी कामगार पक्ष यापुढील काळात खंबीरपणे उभा राहील त्या दृष्टीने येणार्या निवडणुकीत माझ्या शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून मला बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
यावेळी बोलताना डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले, जनतेचा आशीर्वाद हीच आमची काम करण्याची ताकद असून ही निवडणुक लढायला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. बाकी आम्हाला काही नको. तुमच्या आशीर्वादाने डॉ.बाबासाहेब देशमुख हे यापुढील काळात अधिक जोमाने काम करत राहतील, अशी भावना व्यक्त करत कोणत्याही प्रलोभनांना अथवा दशहतील बळी पडून मतदान करु नका, तसा प्रयत्न करणार्या उमेदवाराला मतदानाच्या दिवशी ठेंगा दाखवून शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.