खेळाडूने खिलाडूवृत्तीने स्पर्धेमध्ये उतरले पाहिजे – तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे

सांगोला ( प्रतिनिधी ) मी आज तुमच्या पुढे अधिकारी म्हणून उभा आहे. ते फक्त खो-खो खेळामुळेच. तुम्हाला सुद्धा खेळातून करिअर करण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येकाने खेळाचे मानवी जीवनातील महत्त्व लक्षात घेऊन खिलाडूवृत्तीने स्पर्धेमध्ये उतरले पाहिजे व आपला खेळ दाखवला पाहिजे असे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांनी केले.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय सांगोला व गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगोला तालुका शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३ खो-खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर विकास विद्यालय अजनाळे क्रीडाशिक्षक श्री शंकर कोळवले, माध्यमिक विद्यालय शिवणे पर्यवेक्षक हेमंत रायगावकर,तालुका क्रीडा संयोजक प्रा.डी.के.पाटील, तालुका खो- खो क्रीडा प्रमुख श्री सुभाष निंबाळकर उपस्थित होते.
सांगोला तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये खोखो, कबड्डी, व्हॉलीबॉल, कराटे, तायक्वांदो, कुस्ती, बुध्दीबळ, योगा, क्रिकेट या खेळांचे आयोजन करण्यात आले. आहे.यामध्ये १ ते ३डिसेंबर रोजी तालुका क्रीडा संकुल सांगोला येथे तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धा संपन्न होणार आहेत. याचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विधिवत श्रीफळ फोडून झाले. यावेळी चिंचोली माध्यमिक विद्यालय क्रीडाशिक्षक सत्यवान कोळेकर, विकास विद्यालय अजनाळेचे क्रीडाशिक्षक येलपले सर तालुक्यातून आलेले सर्व क्रीडा शिक्षक, खेळाडू, मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर स्पर्धेमध्ये तालुक्यातील जवळजवळ ३५ ते ४० शाळांनी सहभाग नोंदवला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका क्रीडा संयोजक प्रा.डी.के.पाटील यांनी केले.