सांगोला(प्रतिनिधी):- विरोधकांकडून 3 वर्षात बाबासाहेबांनी काय केले असा सवाल उपस्थित करत आहे त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, 3 वर्षात तुमच्यासारख्याची झोप उडवली एवढेच मी केले असून 23 नोव्हेंबर जनता तुमची कायम स्वरुपीच झोप उडविणार आहे. त्यामुळे आमच्यावरती टीका करुन विरोधकांनी स्वत:चे हसू करुन घेवू नये असे आवाहन डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ उदनवाडी येथे भव्य कॉर्नरसभा संपन्न झाली. यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख बोलत होते.व्यासपीठावर डॉ.अनिकेत देशमुख यांच्यासह मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले की, स्व.आबासाहेब यांनी 60 वर्षात कधीही टक्केवारीचे राजकारण केले नाही. गेल्या 5 वर्षात फक्त तालुक्यात टक्केवारीचे राजकारण झाले आहे. त्यामुळे जनता वैतागली असून महिला भगिनींना रात्री 9 नंतर रस्त्यावर फिरणे सुध्दा मुश्कील झाले आहे. गेल्या 5 वर्षात तालुक्यात दोघांनी मलिंदा गँग तयार केली होती. ठराविक लोकांना कामाच्या माध्यमातून निधी दिला.आणि त्या निधीतून टक्केवारी घेऊन स्वत:चा विकास केला असून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. जनता आता हुशार झाली असून यंदा जनताच तुम्हाला पुन्हा एकदा घरी बसविल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, तालुक्यातील दोघा नेत्यांनी फक्त तालुक्याला वेगळे वळण लावले आहे.तालुक्याला गुंडगिरी, टक्केवारीमुळे कलंक लावला आहे. वाळूतस्करांनी धुमाकूळ घालून सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला आहे. जनतेच्या कामासाठी प्रत्येक गोष्टीत टक्केवारी घेऊन स्वत:चे खिसे भरले आहेत. तेच खिसे आता रिकामे करण्याची वेळ आली असून जनता फक्त डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असून 23 तारखेला शेतकरी कामगार पक्षाचा गुलाल असणार असल्याचे सांगितले.