महाराष्ट्र

सांगोल्यात लोकांचा उत्साह बघून बाबासाहेब आमदार झाल्याची खात्री: भूषणसिंह राजे होळकर

सांगोल्याचा विकास हा आबासाहेबांनी केला आहे. आबासाहेब आमचे आदर्श होते. एक लोकनेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आबासाहेब. “तुम्ही कसले पाणीदार, दुसऱ्यांच्या कामावर आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे तुम्ही. त्यामुळे जनतेला सर्व काही माहित आहे. जनतेने तुम्हाला एकदा एक संधी दिली.त्यावेळी तुम्ही 50 खोके घेऊन जनतेचा स्वाभिमान गहाण ठेवला. ही जनता हे कदापिही विसरणार नाही. जनतेचा स्वाभिमान गहाण ठेवून गुवाहाटीला पळून गेलेल्या आमदाराला आता जागा दाखवण्याची वेळ आली असून सांगोला ची जनता कायमच तुम्हाला गुवाहाटीला पाठवेल असा शहाजीबापूंना टोला लगावत सांगोल्यात लोकांचा उत्साह बघून बाबासाहेब आमदार झाल्याची खात्री झाली असल्याचे “होळकर घराण्याचे वंशज व राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष भूषणसिंह राजे होळकर यांनी टीका केली.

सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख कोळा ता. सांगोला येथे जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी भूषणसिंह होळकर बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड,डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख, दत्ता सावंत, यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष व सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

भूषणसिंह राजे होळकर पुढे बोलताना म्हणाले, येणाऱ्या काही दिवसात 50 खोक्यांचा उपयोग ते करतील. जनतेच्या प्रति निष्ठ काय असते हे आबासाहेबांनी शिकवले आहे. त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा घेऊन बाबासाहेब पुढे जात आहेत. आबासाहेबांच्या नंतर दोन्ही भावंडांनी आबासाहेबांचे विचार रुजवण्यासाठी सांगोल्याच्या या पवित्र मातीत आपले पाय रोवून घेतलेले आहे. त्यामुळे सर्वांनी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन करत भाजपाने सबका साथ सबका विकास म्हणत आपल्या सर्वांमध्ये भांडण लावण्याचे काम केले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी जेष्ठ नेते बाबुराव भाऊ गायकवाड म्हणाले की, सरकारला आज लाडक्या बहिणी दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये देशांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचे काम पवार साहेबांनी केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी सर्व पवार साहेबांना मानतात. सांगोला तालुक्यातील दोघेजण एकमेकाला काही पण सध्या म्हणत आहेत परंतु आमचा उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही उभा केला असून आम्ही कुणाला पाडण्यासाठी उभे नाहीत तर आम्ही निवडून येणार आहोत म्हणून उभे आहोत. त्यामुळे सर्वांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना विजयी करा असे आवाहन केले.

यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, आबासाहेबांच्या निधनानंतर सुद्धा हा तालुका निष्ठावंतांचाच आहे. आणि भविष्य काळात सुद्धा हा तालुका निष्ठावंतांचाच तालुका म्हणून ओळखला जाईल. काम करत असताना काही चुका झाल्या असतील तर पदरात घ्या असे भावनिक आवाहन केले.

यावेळी डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले की, आबासाहेबांनी आयुष्यात कधीही पाण्याबाबत राजकारण केले नाही. शेतकऱ्यांचे पिके जळत असताना गेल्या पाच वर्षात लोकप्रतिनिधीनी पाण्याबाबत राजकारण केले हे दुर्दैवी आहे. उभी पिके जळत असताना डोळ्यात पाणी आले
पण लोकप्रतिनिधीच्या हृदयाला पाझर फुटला नाही याचा विचार शेतकरी बांधव करतील असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी कोळा भागातून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तरुणांसह ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी लाभला होता. कोळा परिसरात सर्वत्र लालबावटा दिसून येत होता त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना कोळा भागातून मोठे मताधिक्य मिळेल असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button