सांगोला तालुका

भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी केलेल्या कामाचे फडणवीसांकडून कौतुक

सांगोला ( प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम प्रभावीपणे राबवून केलेल्या कामाचे कौतुक केले. मतदार नोंदणी, सरल ॲप, मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाचे विशेष कौतुक केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी
स्व. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यासाठी सांगोल्यात आले होते. चेतनसिंह केदार-सावंत यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच सांगोल्यात आले होते. यावेळी फडणवीस यांचे सांगोला शहरात आगमन होताच पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर ज्योतिर्लिंग कॉम्प्लेक्समध्ये जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. फडणवीसांच्या स्वागतासाठी सांगोला शहरात डिजिटल फलक आणि भाजपचे झेंडे ठिकठिकाणी लावण्यात आल्याने संपूर्ण शहर भाजपमय झाले असल्याचे दिसून आले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी भाजपची मतदार नोंदणी, सरल ॲप, मेरा बूथ सबसे मजबूत, नमो ॲप, मेरी मिट्टी मेरा देश, टिफीन बैठक, हर घर तिरंगा, मोदी @९, घर चलो अभियान यासह इतर सर्व कार्यक्रमांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांनी जिल्ह्यात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सन २०१८-१९ मधील मंगळवेढा व सांगोला येथील सुमारे २०० चारा छावणी चालकांची सरकारकडे ३४ कोटी रुपयांची बिले थकित आहेत. प्रलंबित बिले मिळावीत यासाठी २६ जुलै पासून छावणी चालकांचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. त्यामुळे चारा छावणी चालकांची बिले तात्काळ देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच सध्या सांगोला तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतातील पिके, फळबागा वाचविण्यासाठी टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालव्यातून तालुक्यातील माण , कोरडा, बेलवण, अप्रुका नदीवरील बंधारे, तलाव पाण्याने भरून द्यावेत अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी फडणवीस यांनी चेतनसिंह केदार-सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा करून या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!