गूढ आवाजांचा शोध घेण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांची सांगोल्यात पाहणी

सांगोला, ता. १४ : सांगोला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूगर्भातून येणाऱ्या गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ३ एप्रिल रोजी सांगोला शहर व परिसरात मोठा आवाज झाल्यानंतर याविषयी अधिकृतरीत्या चौकशी सुरू झाली असून, या आवाजामागील कारणांचा शोध घेण्यासाठी पुणे व सोलापूर येथील भूगर्भशास्त्रज्ञांच्या पथकाने सोमवारी (ता. १४) सांगोल्यात भेट दिली.
या पथकात पुणे येथील केंद्रीय जलसंपदा विभागातील शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे, सोलापुरातील वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख, कनिष्ठ भूवैज्ञानिक नदाफ या चार वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञांचा समावेश होता. त्यांनी ३ एप्रिल रोजी संभाव्य भूकंपाचे केंद्रस्थळ असल्याचे दर्शविलेल्या भागाची पाहणी केली. या भागातील बोरवेलमधून पाण्याचे नमुने घेतले गेले असून, त्यावर विविध शास्त्रीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. ३ एप्रिल रोजी सांगोल्यात झालेला आवाज भूगर्भातील हालचालींशी संबंधित कारणांचा शोध घेतला जाणार आहे.
भविष्यात अशा गूढ आवाजांचे व भूगर्भातील हालचालींचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी अधिक अभ्यास केला जाणार आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या या पाहणी दरम्यान सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे उपस्थित होते. त्यांनी विविध अधिकाऱ्यांसोबत पाहणी स्थळावर भेट देत सविस्तर माहिती घेतली.



