महाराष्ट्र
सोलापूर जिल्ह्यात पशुगणनेस प्रारंभ; पशुगणनेसाठी प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती
जिल्ह्यात २१ व्या पशुगणनेला मंगळवार पासून प्रारंभ झाला असून,दि. २८ फेब्रवारी पर्यंत ही मोहीम चालणार आहे. ग्रामीण भागासाठी तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची तर शहरी भागासाठी चार हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती केली आहे. पशुगणनेमुळे पशुसंवर्धन विभागाला योजनांची अंमलबजावणी करणे, निधीची उपलब्धता करणे सोयीचे ठरणार आहे.
पशुसंवर्धन विभागाकडुन दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच हो मोहीम राबवली जाणार. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून तयारी केली आहे. जिल्हयात ग्रामीण भागात १ हजार ४६७ गावांसाठी २११ प्रगणक व ६१ पर्यवेक्षक असून, शहरी भागासाठी ८१ प्रगणक व १९ पर्यवेक्षक असे एकूण २९२ प्रगणक व ८० पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.पशुगणनेसाठी नेमलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना तालुकानिहाय प्रशिक्षण देण्यात आले आहे. पशुगणना मोहिमेत गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुट पक्षी, पशुपालनात वापरली जाणारी यंत्रसामग्री यांची गणना केली जाणार आहे.
जिल्हयातील सर्व पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशुंची अचुक व योग्य माहिती द्यावी हा राष्ट्रीय उपक्रम आहे. सदर पशुगणनेच्या आधारावर शासनाकडून विविध धोरण, योजना आखल्या जातात, निधीची उपलब्धता केली जाते. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे. त्यानुसार लसीकरण, औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आपलेकडील जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी प्रगणकांना द्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विशाल येवले यांनी केले आहे.