शिक्षणाइतकेच संस्कार महत्त्वाचे -प्रा.प्रबुद्धचंद्र झपके; सांगोला विद्यामंदिर इ.१२ विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) १९६७ पासून सुरू सांगोला विद्यामंदिरमध्ये सुरु असलेले बोर्ड परीक्षा केंद्र ‘कॉपीमुक्त केंद्र’ असा नावलौकिक आजही कायम ठेवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेला गैरमार्गाचा अवलंब न करता ,आत्मविश्वासाने,परिपूर्ण अभ्यासाच्या तयारीने समोरे जावे.यासाठी सांगोला विद्यामंदिरच्या शैक्षणिक प्रवासातून तुम्हाला मिळालेले संस्कार शिक्षणाइतकेच महत्त्वाचे ठरणा असे प्रतिपादन प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २४-२५ मधील इयत्ता १२ वी कला, वाणिज्य व शास्त्र शाखा शुभेच्छा समारंभामध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थासचिव म. शं. घोंगडे, सांगोला महाविद्यालयाचे प्रा.गणेश पैलवान,प्रा.आदर्श झपके उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी स्वतःची ओळख स्वतः निर्माण करा असे सांगत उत्तुंग यश मिळवण्यासाठीची अभ्यास पद्धती,त्यामधील सातत्य,तसेच योग्य आहार याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.
शुभेच्छा समारंभामध्ये सुरवातीला प्रास्ताविकातून उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे यांनी पुढील शिक्षणासाठी सांगोला विद्यामंदिरचा निरोप घ्यावा लागणार असला तरी सांगोला विद्यामंदिर मध्ये मिळालेल्या ज्ञानाचा, विचारांचा निरोप घेऊ नका तो तुमच्यासाठी प्रगल्भता निर्माण करणारा आहे असे सांगत शुभेच्छा समारंभाचा हेतू विशद केला व उपस्थिताचे स्वागत केले. त्यानंतर सांगोला महाविद्यालयाचे प्रा. गणेश पैलवान यांनी बारावीनंतरच्या विविध कोर्स विषयी सविस्तर माहिती दिली. सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील प्रा.इसाक मुल्ला यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी मिळणारा उपलब्ध वेळ यांची जाणीव जागृती करत.मनाची एकाग्रता,व परीक्षेसाठीची तयारी यश मिळवून देईल असे सांगितले.
ज्युनिअर कॉलेजमधील आशा बुरांडे,गौरी वाघमारे, सृष्टी लिगाडे,विदिशा इंगोले,प्रतिभा येलपले, प्रियांका खताळ, वैभवी रोडगे,गुरुनाथ व्हटे यांनी मनोगते व्यक्त करून शालेय जीवनातील काही आठवणी सांगत प्रशाला, संस्था,ज्युनिअर कॉलेज व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद यांनी बोर्ड परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना देऊन आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना ‘कॉपीमुक्त अभियान’ याविषयी शपथ देण्यात आली.
सदर कार्यक्रमास ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र कुंभार यांनी तर आभार प्रा.सागर बुधावने यांनी केले.