जवळे केंद्रातील इमडे-करनवर-बर्वे वस्ती शाळेस आदर्श शाळा पुरस्कार प्रदान

सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार जवळे केंद्रातील आदर्श शाळा इमडे-करनवर-बर्वे वस्तीशाळेस प्राप्त झाला असून नुकताच सोलापूर येथे पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तो देण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक समाधान कांबळे सहशिक्षक दर्याबा (कांता)ईमडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आबासाहेब इमडे यांनी तो स्वीकारला. इमडे करनवर वस्ती शाळेचे कार्य अतिशय उत्कृष्ट असून ‘स्वच्छ शाळा,सुंदर शाळा’ उपक्रमामध्ये या शाळेने खूप मोठे उल्लेखनीय कार्य केले आहे. बोलक्या भिंती, वाचनीय तक्ते, आकर्षक वर्ग रचना या सर्व गोष्टींमुळे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खूप आनंददायी अध्ययन-अध्यापनाचा अनुभव घेता येतो. पालकांचे सहकार्यही मोठे आहे. शाळेतील दोन्ही शिक्षकांना यापूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पुरस्कार वितरण कार्यक्रम पतसंस्थेचे मार्गदर्शक बाळासाहेब काळे, चेअरमन म.ज. मोरे, व्हा. चेअरमन शेखर कोरके, संचालक गुलाबराव पाटील सर्व संचालक यांचे उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी जिल्हा संघाचे उपाध्यक्ष संजय काशीद पाटील, शिक्षक नेते विकास साळुंखे-पाटील, दीपकआबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्था संचालक वसंत बंडगर, संजय गायकवाड, कैलास मडके, सुरेश साळुंखे, जवळे केंद्राचे केंद्रप्रमुख मनोहर इंगवले, शिवाजी चौगुले,कालिदास मुंडे सह अनेक शिक्षक उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मा. आ.दीपकआबा साळुंखे पाटील, मा. सरपंच दत्तात्रय बर्वे, शिक्षण विस्ताराधिकारी श्री. लक्ष्मीकांत कुमठेकर, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी शिक्षकांचे व पालकांचे विशेष अभिनंदन केले आहे. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेचे व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.