सांगोला येथे मित्राने केला मित्राचाच खून
सांगोला (प्रतिनिधी):- टेम्पो वाहन खरेदी व्यवहारातून झालेल्या वादातून मित्राने मित्राच्याच पोटात व छातीवर चाकूने वार करून मित्राचा खून केला असल्याची घटना मंगळवार 1 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा आठ वाजणेच्या सुमारास सांगोला शहरातील मध्यवर्ती असलेल्या धान्य बाजार पटांगणावर घडली आहे. नवाजअकबर मुलाणी वय 25 रा.सांगोला असे खून झालेल्या तरुणांचे नाव आहे.
याबाबत सांगोला पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, नवाज मुलाणी व तन्वीर पठाण हे दोघेही जीवलग मित्र होते. दोघेही भागिदारीत व्यवसाय करत होते. मागच्या काही दिवसापासून तनवीर आणि नवाज यांच्यामध्ये टेम्पोच्या पैशावरुन वाद चालू होता. 1 ऑगस्ट रोजी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास नवाज आणि त्याचा मित्र मोहम्मद ईराणी असे दोघे जण धान्य बाजारात बोलत थांबले होते. त्यावेळी तन्वीर तेथे येवून नवाज बरोबर भांडण करु लागला. नवाजला शिव्या देत तु माझे टेम्पोचे पैसे देतो का नाही , तुझी लय नाटके झाली आहेत, आता तुला जिवंत सोडत नाही असे बोलून त्याने त्याचे कंबरेला लावलेल्या चाकूने नवाजच्या पोटात व छातीत वार केले.
नवाजला गंभीर जखमी अवस्थेत सांगोल्यात खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु त्यास तातडीने पुढील उपचारासाठी पंढरपूर येथे हलविण्यात आले. दरम्यान नवाज मुलाणी याचा बुधवार (दि.2 ऑगस्ट) रोजी सकाळी सोलापुर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत नवाज मुलाणी यांनी तनवीर पठाणच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मृत्यूपूर्व जबाब दिला आहे. पोलिसांनी नवाज मुलाणी याच्या जबाबानुसार तनवीर पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सांगोला पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक हेमंत काटकर हे करीत आहेत.