सांगोला:दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले चोरट्यांनी
सांगोला(प्रतिनिधी):- दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांकडून पळविले असल्याची घटना अंबिका देवी मंदिर परिसरात 4 फेब्रुवारी 2025 रोजी घडली. या घटनेची पोलीस स्टेशनमध्ये नोंद नसून मंगळसूत्र गेलेल्या महिलेकडून याबाबत कोर्या कागदावर अर्ज घेण्यात आला आहे.
सांगोल्याचे ग्रामदैवत अंबिकादेवीची यात्रा सध्या मार्केट यार्ड परिसरात सुरु आहे. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यात्रेमध्ये छोट्या मोठ्या चोर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. याबाबत पोलीसांकडे तक्रार देण्यास संबंधीत कोणी गेले असता त्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे नागरिक, व्यापारी वर्गांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यात सोनसाखळी चोर्यांचेही प्रमाण सांगोला तालुक्यात वाढले असून सोनसाखळी चोर्यांचा पोलीसांकडून तपास लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कोणतीही तक्रार देण्यात गेले असता संबंधीतांना एक ना अनेक प्रश्न विचारण्यात येत असून तक्रार घेण्यास पोलीसांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे पोलीसांविषयी सांगोला शहरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.