सांगोला विद्यामंदिर प्रशालेस महाराष्ट्र विद्यालय, बार्शीची अभ्यास भेट

महाराष्ट्र विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज, बार्शी येथील शिक्षकांनी सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे अभ्यास भेट देत येथील शालेय तसेच इतर बाह्यपरीक्षा यांची माहिती घेतली.
यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे प्राचार्य अमोल गायकवाड, महाराष्ट्र विद्यालय, बार्शीचे उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे, सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले उपस्थित होते.
सांगोला विद्यामंदिर प्रशाला ही संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या प्रेरणेतून व सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करणारी, शिस्त जोपासणारी व संस्कार रुजवणारी शाळा म्हणून जिल्ह्यात नावारुपास असून या शाळेमध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती, एन.एम.एम.एस.,डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षा, गणित संबोध परीक्षा, गणित प्राविण्य परीक्षा, गणित प्रज्ञा परीक्षा, विज्ञान प्राविण्य परीक्षा, विज्ञान प्रज्ञा परीक्षा तसेच इयत्ता नववी-दहावी करिता विद्यार्थ्यांसाठी सुरू असणारे फाउंडेशन कोर्स या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होत आहे. विविध प्रकारची शिष्यवृत्ती संपादन करणारे दरवर्षी शेकडो विद्यार्थी तयार होत असल्याने या विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक क्षमतेबरोबरच शिक्षणासाठी आर्थिक हातभार सुद्धा लागत आहे.
या सर्व परीक्षांची वर्षभराची कार्यवाही मोफत मार्गदर्शन वर्गाद्वारे होत आहे ही बाब कौतुकास्पद असून याचे नियोजन जादाचे मोफत मार्गदर्शन वर्ग, पालक सभा, सराव चाचण्या, शिक्षक-पालक योजना, पालक संपर्कासाठी गृहभेट अभियान, विद्यार्थी प्रोत्साहनपर बक्षीस योजना, मेडिटेशन यासारख्या गोष्टींची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशा पद्धतीने होते याची चिकित्सापूर्वक माहिती यावेळी महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील अभ्यासभेट दौऱ्यातील शिक्षकांनी जाणून घेतली.
यावेळी संस्था व प्रशाला बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख नामदेव खंडागळे व वैभव कोठावळे, एन.एम.एम.एस. विभागप्रमुख निलेश जंगम, आठवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रमेश बिले, पाचवी शिष्यवृत्ती विभागप्रमुख नागेश पाटील, शिवाजी चौगुले, आशितोष नष्टे यांनी आपल्या विभागांच्या कार्यवाहीविषयी माहिती देत उपलब्ध मार्गदर्शक पुस्तके, सरावसंच यांची चर्चा करत शंकांचे समाधान केले तसेच महाराष्ट्र विद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विशेष बाबींची नोंद घेतली.अभ्यास भेटीमध्ये महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या एम.जी.माने, एस.एम.डिसले, एस.एल.देशमुख, एस.डी.देशमुख, एस.एस.पाटील, एस.ए.लोखंडे, ए.आर.जाधव या शिक्षकांचा समावेश होता.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील समाजाच्या जडणघडणीवेळी सोलापूर जिल्ह्यात शिक्षण संस्थांचे जाळे उभा करत निस्वार्थपणे समाजहित जोपासणारे कर्मवीर कै.मामासाहेब जगदाळे व थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य, कै.चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या विचारांचा वारसा घेऊन तत्वांची जोपासना करणाऱ्या दोन्ही शिक्षण संस्थांच्या शैक्षणिक चर्चेतून साधक चर्चा झाल्याचे समाधान उपस्थितांच्या बोलण्यातून जाणवले.