सागर माळी यांची स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर निवड

मनाशी ठाम निश्चय व काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर अनेक अडथळ्यातून मार्ग काढत माणूस यशाला गवसणी घालू शकतो आणि याचीच प्रचिती देणारी व अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशी यशोगाथा चिंचोली, तालुका सांगोला गावातील श्री सागर सुखदेव माळी यांची आहे. IBPS द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत असे यश प्राप्त करत श्री सागर सुखदेव माळी यांची केंद्र शासनाच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या बहुप्रतिष्ठित बँकेत सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager- Scale 1 Officer) या पदावर निवड झाली आहे.
श्री सागर सुखदेव माळी यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली तर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सांगोला येथून व कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी येथून त्यांचे कृषी विषयक पदवी शिक्षण पूर्ण झाले व नंतर त्यांनी बँकिंग या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.शेतकरी कुटुंब, आई वडील व मोठे बंधू यांनी केलेले कष्ट व आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींची जाणीव राखत एक अधिकारी बनण्याची त्यांची जिद्द होती व त्या जिद्दीला कष्ट व सातत्य यांची जोड देत त्यांनी त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले. 2018 ला चालू झालेला स्पर्धा परीक्षेचा प्रवास अखेर 2024 ला पूर्ण झाला व त्यांची
केंद्र शासनाच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या बहुप्रतिष्ठित बँकेत सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager- Scale 1 Officer) या पदावर निवड झाली.
या यशाचे संपूर्ण श्रेय ते त्यांचे वडील सुखदेव माळी, आई इंदुमती माळी, मोठे बंधू सचिन माळी (पोलिस अधिकारी) त्यांचे भाऊजी चेतन शिंदे, दत्तात्रय बनकर, राजाराम जाधव व पत्नी शितल माळी तसेच आपल्या संपूर्ण कुटुंबीयांना देतात.



