सांगोल्यात शिवकालीन शस्त्रास्त्र पाहून शिवप्रेमी भारावले

सांगोला (प्रतिनिधी):- इतिहासप्रेमींना शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रे पाहता यावीत, या उद्देशाने सांगोला शहरात शिवप्रेमी मंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात ठेवण्यात आलेली, शिवकालीन शस्त्रे पाहून शिवप्रेमी नागरीकांसह विद्यार्थी भारावले.
बार्शी येथील शस्त्रसंग्रहक माधवराव देशमुख (बार्शी) एकविराई मर्दानी आखाडा मधील 300 पासून 700 वर्षापर्यंतच्या शस्त्रास्त्रांचा संग्रह या प्रदर्शनात पाहण्यास मिळत आहेत. शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या प्रदर्शनास शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यात तलवारीचे विविध प्रकार, कट्यारी, जांबिया, भाले, बचीर, ढाली, हिरेटोप चिलखत, वाघनखे, खंडा, कुकरी, मशाल, गुप्ती, जिरेटोप, जांबिए, खंजीर, कुर्हाडी, मुठी, दुधारी धोप, तोफगोळे, विळा, कात्री, संगीन, धनुष्यबाण यासह 300 शिवकालीन शस्त्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. शहरातील शिवप्रेमींसाठी दिवसभर हे शस्त्र प्रदर्शन खुले ठेवण्यात आले होते.