सांगोला(प्रतिनिधी):- शासकीय कामात अडथळा निर्माण करुन शासकीय कर्तव्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला म्हणून दोन जणांविरुध्द सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. सदरची घटना सोनंद येथील कोरडा नदीचे बंधार्यायाजवळ घडली असून घटनेची फिर्याद दिग्वीजय पाटील यांनी दिली आहे.
याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, दि.19 फेब्रुवारी रोजी रात्री 10.35 वाजताचे सुमारास फिर्यादी यांना बिगर नंबर प्लेटचा टेम्पो चालक अवैध वाळूसह मिळुन आला होता. त्यास टेम्पोसह तहसील कार्यालय सांगोला येथे घेवून येत पाठीमागून एक इसमाने टेम्पो थांबवणेस सांगुन स्वता टेम्पो चालवणेस बसला. त्यावेळी फिर्यादी यांनी टेम्पो तहसील कार्यालयास घेण्यास सांगितले असता गाडी कुठेही थांबवणार नाही किंवा घेणार नाही असे म्हणत फिर्यादी यांनी हात धरुन गाडी थांबव असे म्हणत असताना फिर्यादी दिग्वीजय पाटील यांना धक्का मारुन बाजुला करुन तुला बघून घेतो, तुला कोणाला फोन लावायचा ते लाव तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत दमदाटी व धक्काबुक्की केली. त्यामुळे सरकारी कामात मला अडथळा निर्माण करुन शासकीय कर्तव्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला म्हणून दोघाविरुद्ध कायदेशिर तक्रार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोना नलवडे हे करीत आहे.