महाराष्ट्र
प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांचे जळगाव येथील राष्ट्रीय चर्चासत्रात. कॅन्सर विषयक व्याख्यान

शनिवार, दिनांक 01 मार्च 2025 रोजी पाचोरा ट्रस्ट को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सौ. आर. एन. देशमुख महाविद्यालय, भडगाव, जिल्हा जळगाव व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने “सामाजिक शास्त्रांची समकालीन समाजामधील भूमिका” याविषयी आंतरविद्याशाखीय संशोधनावर आधारित राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. सदर चर्चासत्रा मध्ये कर्करोग जनजागृती करण्याच्या दृष्टीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर व्याख्यानास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांगोला महाविद्यालयाचे प्राध्यापक व कॅन्सर संशोधक डॉ. प्रकाश अरुण बनसोडे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रमास कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. महेश्वरी, प्र.कुलगुरू, अधिष्ठाता व विविध विभागांचे संचालक तसेच पाचोरा ट्रस्ट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी आमदार भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व टाटा कॅन्सर हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई, यांच्या सहकार्याने महिलांमधील कर्करोगावर उपयुक्त असणाऱ्या सुरक्षित व प्रभावी औषधांचा शोध याविषयी महत्त्वाचे संशोधन केले आहे. तसेच त्यांनी कॅन्सर विषयक जनजागृती व्याख्याने दिली आहेत. सदर व्याख्याना मध्ये डॉ. बनसोडे हे महिलांमधील स्तनांचा, गर्भाशयाचा व बीजाशयाचा कर्करोग तसेच तोंडाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग या विविध प्रकारच्या कर्करोगांबाबत संभाव्य कारणे, प्रथमदर्शी लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. सदर व्याख्यानात कर्करोग टाळण्यासाठी आवश्यक नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब, निरोगी राहण्यासाठी व्यायाम व संतुलित आहार, तंबाखू, दारू, गुटखा, खेनी, पान मसाला, मशेरी यासारख्या व्यसनांना प्रतिबंध, रजो निवृत्तीनंतर होणारे संप्रेरक बदल व घ्यावयाची काळजी याबाबत सखोल व महत्त्वपूर्ण बाबींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर कार्यक्रमास विविध राज्यातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.