सांगोला महाविद्यालयात विरंगणा ग्रुपच्या सहयोगाने महिला दिन समारंभ संपन्न

सांगोला/प्रतिनिधी: दि.7 मार्च 2025 रोजी सांगोला महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समिती व विरंगणा महिला ग्रुप, सैनिकनगर, मैत्रीण कुटुंब सल्ला यांच्या वतीने महिला दिन समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ. सिंधू देशमुख निर्भया, बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तर अध्यक्ष म्हणून सांगोला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले हे उपस्थित होते.
या समारंभाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे सौ. सिंधू देशमुख यांनी स्वसंरक्षण या विषयावर संपूर्ण माहिती दिली. मुलींनी विरंगणा ग्रुप मधील महिलाप्रमाणे स्वतःबरोबर कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे पार पाडत असताना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवली पाहिजे. तर सशक्त् समाजाची निर्मिती होईल यावर आपले विचार मांडले. तसेच “तेरे मेरे सपने” या महिला आयोगाच्या वतीने नवीन उपक्रमाची माहिती ॲड. राजश्री केदार यांनी मुलीं समोर मांडली. या उपक्रमाची किती आवश्यकता आहे याचे स्पष्टीकरण दिले. अध्यक्ष मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ सुरेश भोसले यांनी महिला दिनाचे विशेष महत्त्व सांगून, महिलांचा सन्मान केला. अनेक यशस्वी महिलांची माहिती देऊन मुलींनी त्यांचा आदर्श घ्यावा यासाठी आपले विचार मांडले.
या समारंभात सांगोला परिसरातील यशस्विनींच्या त्यांच्या कार्यकारिणी कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. त्यामध्ये वीरपत्नी श्रीमती उज्वला शिंदे, अर्चना गावडे, रूपाली माने यांचा विशेष सत्कार झाला. पोलीस सौ. प्रतिभा काशीद, सौ. सुरेखा लवटे (पोलीसपाटील बुरलेवाडी) कवयित्री सौ. सुवर्णा तेली, सौ.हर्षदा गुळमिरे, उदयोजिका सौ. सुषमा भिंगे, सौ. सुजाता काकेकर, सौ.अर्चना इंगोले, सौ. रूपाली पवार व कीर्तनकार सौ. सुप्रिया बंडगर यांचा सत्कार झाला. सत्काराच्या निमित्ताने सौ. हर्षदा गुळिमिरे व तेली यांनी आपले मनोगत काव्य् सादर करुन व्यक्त केले. यावेळी कराटेतील यशाबद्दल कु. शुभदा गव्हाणे हिचाही सत्कार करण्यात आला.
शेवटच्या सत्रात महिलाच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण झाले. यावेळी मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राच्या समुपदेशनाची माहिती सुद्धा महिलांना देण्यात आली. या समारंभास वसतिगृहातील 250 हून अधिक मुली व रुबाब करिअर अकॅडमीतील 50 हून अधिक मुली उपस्थित होत्या. तर सांगोल्यातील सैनिक नगरच्या वीरगंणा ग्रुप व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व कार्यक्रमासाठी महिला व मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या समारंभासाठी सांगोला पोलीस स्टेशनच्या सौ. जुलेखा शेख, सौ. छाया तेली, सौ. प्रज्ञा पाटील (मंगळवेढा पोलीस स्टेशन) श्री. गणेश बाबर मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र, सौ. सुवर्णा गव्हाणे यांची प्रमुख उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. चित्रा जांभळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. अपूर्वा गोपलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांनी परिश्रम घेतले तर विरंगणा ग्रुपच्या सौ. सुवर्ण तेली व सौ. शैलजा चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. सत्कार समारंभाचे नियोजनासाठी कु. बोत्रे, कु. भुईटे, कु. सोनटक्के, कु. स्नेहा काकेकर, यांचेही बहुमोल मार्गदर्शन बहुमोल सहकार्य लाभले.