गडहिंग्लज : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स (मल्टी-स्टेट) प्रधान कार्यालय, गडहिंग्लज या संस्थेने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी ५०० कोटी ठेवींचा टप्पा पार करण्याचा संकल्प केला होता. तो ३१ मार्चपुर्वी गुढी पाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या पुर्वसंध्येला पुर्णत्वास जाऊन ५०० कोटी ठेवींची संकल्पपुर्ती झाली. त्यामुळे संस्थेचे बँकेत रुपांतर करण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती ‘रवळनाथ’ चे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांनी दिली.
श्री. एम. एल. चौगुले म्हणाले, पारदर्शक व्यवहार, तत्पर सेवा आणि सभासद, ग्राहकांनी दाखवलेला विश्वास यामुळेच संस्थेने अल्पावधीत मोठी प्रगती केली आहे. संस्थेच्या अनेक ठेवीदारांनी गुंतवणूक करून हा विश्वास अधिक दृढ केला आहे. संस्थेच्या आजरा, गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगाव, निपाणी, कुडाळ, सुविधा केंद्र गडहिंग्लज, सांगली, पुणे, कराड, सांगोला, चिक्कोडी या १५ शाखांमधून मोठ्या प्रमाणात ठेवी जमा झाल्या आहेत, यामध्ये गडहिंग्लज शाखेने १५१ कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. ५०० कोटी ठेवींसाठी अन्य पतसंस्थांनी देखील आपल्या ठेवी ठेऊन आम्हाला सहकार्य केले आहे.
गेल्या अडीच दशकांपासून सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांनी चिकाटीने प्रयत्न करुन संस्थेची यशस्वी घोडदौड कायम राखली आहे. नवनवीन योजना आणि अधिकाधिक उत्तम ग्राहक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळेच संस्थेने सन २०२४-२५ सालाकरीता असलेले ५०० कोटी ठेवींचे लक्ष्य पूर्ण केले आहे. आगामी काळात देखील संस्थेकडून सभासदांना, ग्राहकांना अत्याधुनिक सेवासुविधा देण्यावर अधिक भर दिला जाईल.
याकामी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे, सर्व संचालक, सर्व शाखांचे शाखा चेअरमन, सल्लागार, संस्थेचे सीईओ श्री. डी. के. मायदेव, सर्व अधिकारी, शाखाधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.