महाराष्ट्र

नाझरा विद्यामंदिरमधील किशोरी बाबर व अनुष्का पाटील यांना “अक्षरमित्र” पुरस्कार जाहीर

नाझरा (वार्ताहर):- नाझरा विद्यामंदिर मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी वाचन व रसास्वाद अभियान राबवण्यात आले होते.या अभियानात वर्षभरात वाचनालयाची व इतर अशी 80 पुस्तके वाचून इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी किशोरी शहाजी बाबर व 60 पुस्तके वाचून इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी अनुष्का शिरीष पाटील या दोघींना नाझरा विद्यामंदिर च्या वतीने “अक्षरमित्र”पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके व संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध प्रयत्न केले जातात. त्यांच्या संकल्पनेतून व प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,कवी सुनील जवंजाळ यांच्या प्रोत्साहनातून वाचन व रसास्वाद हे अभियान राबवण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील जास्तीत जास्त पुस्तके वाचून त्याचा रसास्वाद लिहिण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहित केले होते.या अभियानात प्रशालेतील 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील अनेक पुस्तके वाचून या अभियानात सहभाग नोंदवला होता.जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्यांसाठी अक्षरमित्र पुरस्कार जाहीर करण्यात येणार होता,अनेक विद्यार्थ्यांची यामध्ये स्पर्धा लागलेली होती. वाचलेल्या पुस्तकावर पाच ते सहा ओळी रसास्वाद लिहिणे आवश्यक होते. या सर्वांमधून दोन उत्कृष्ट विद्यार्थी वाचकांना अक्षरमित्र पुरस्काराने एक मे महाराष्ट्र दिनी मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ गौरवण्यात येणार आहे.

– – – – – – – – – –

सध्या मुलांचा मोबाईल कडे जास्त कल वाढलेला आहे. अगदी लहान मुलांपासून ते दहावी बारावीला असणारे विद्यार्थी सातत्याने मोबाईल वापरताना दिसतात. खेळ व वाचन या गोष्टी शरीराला आणि मनाला सदृढ करणाऱ्या आहेत परंतु याकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत आहे.नाझरा विद्यामंदिरच्या माध्यमातून अक्षरमित्र हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवल्यामुळे बरेच विद्यार्थी वाचनाकडे वळालेले दिसत आहेत. निश्चितपणे ही संकल्पना प्रत्येक शाळांमध्ये राबवल्यास विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण होईल. त्यातून काही कवी व लेखक उदयास येतील.
पालक- रुपाली बाबर ( चोपडी)

– – – – – – – – – –
विद्यार्थ्याच्या मनाची जडणघडण ही पुस्तकाच्या माध्यमातून होते. शालेय परीक्षेतील प्रश्नाच्या उत्तरासाठी अभ्यासक्रमातली पुस्तक वाचली जातात परंतु जीवनात येणाऱ्या असंख्य प्रश्नांच्या उत्तरासाठी अवांतर पुस्तक वाचनाची नितांत गरज असते. पुस्तक वाचनातून मनाची समृद्धी वाढत जाते. पुस्तकाच्या माध्यमातून पानांपानावर मिळणारे विविध प्रकारचे अनुभव जगण्याला समृद्ध करणारे असतात. विद्यार्थ्याच्या जीवनात वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी नाझरा विद्यामंदिर प्रशालेत वाचन व रसास्वाद हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला होता. त्या उपक्रमाला गेल्या वर्षभरात उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आहे. अशा प्रकारच्या वेगळ्या उपक्रमातून या पुढील काळात जास्तीत जास्त विद्यार्थी ग्रंथालयाकडे वळतील अशी आशा आहे.
……प्रा. प्रबुद्धचंद्र झपके
(अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button