महाराष्ट्र

किती काळ रमणार…

राज्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या 16 एप्रिलला त्यांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आस्वाद पाटील यांचा भाजप प्रवेश पक्षासाठी उपयुक्त ठरणार असून, शेकापला हादरा देण्याची भाजपची खेळी यशस्वी होणार आहे,असे दिसते.

आस्वाद पाटील हे शेकापच्या माजी आमदार मिनाक्षीताई पाटील यांचे चिरंजीव आहेत. शेकापचे जिल्हा चिटणीस पद त्यांनी प्रदीर्घकाळ सांभाळले आहे. सुरवातीला अलिबाग पंचायत समितीचे सभापती पद, त्यानंतर जिल्हा परिषदेचे गट नेते पद, अर्थ व बांधकाम सभापती पद आणि उपाध्यक्षपदी त्यांनी काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणा अचूक जाण त्यांना आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर त्यांची घट्ट पकड राहिली आहे. त्यामुळे भाजपसाठी त्यांचा पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्याने, आस्वाद पाटील नाराज होते. अलिबाग विधानसभेतून त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आस्वाद पाटील यांना उमेदवारी नाकारली, त्या ऐवजी सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली. पाच वर्ष चित्रलेखा पाटील मतदारसंघ बांधण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचा दाखला देण्यात आला. यामुळे पाटील कुटुंबात मात्र वादाची ठिणगी पडली. जयंत पाटील यांच्या या निर्णयामुळे नाराज असलेले त्यांचे बंधू आणि माजी आमदार सुभाष उर्फ पंडीत पाटील आणि भाचे आस्वाद पाटील निवडणुकीतील प्रचारापासून दूर राहिले. त्याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला. शिवसेनेचे महेंद्र दळवी चित्रलेखा पाटील यांचा पराभव करत पुन्हा आमदार झाले. सलग दुसर्‍यांना बिगर शेकाप आमदार निवडून येण्याची ही पन्नास वर्षातली पहिलीच वेळ होती. पक्षातील पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. आणि जिल्हा चिटणीसपद आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

भाजपचे जिल्हा संघटक सतिश धारप, जिल्हाध्यक्ष खा. धैर्यशील पाटील आणि प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आस्वाद पाटील यांच्या संपर्कात होते. मात्र पक्षप्रवेश विविध कारणांमुळे पुढे जात होता. आस्वाद पाटील यांचा भाजप प्रवेश होत नसल्याने, त्यांच्या सहकार्‍यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली होती. आता मात्र 16 एप्रिल रोजी आस्वाद पाटील यांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आस्वाद पाटील यांच्या समवेत शेकापचे किती जण भाजपमध्ये प्रवेश करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुक लढविणार्‍या स्नेहल जगताप या देखील भाजपच्या वाटेवर होत्या. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपकडून ठोस निर्णय होत नसल्याने, त्यांनी भाजप ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आस्वाद पाटील यांच्याबाबतीतही असेच होणार का याची चर्चा सुरू झाली होती.

सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्याशी आस्वाद पाटील यांचे चांगले संबध आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कधीही जाऊ शकतील असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आस्वाद पाटील यांचा पक्ष प्रवेश भाजपसाठी महत्वाचा आहे. पनवेल, उरण, अलिबाग आणि पेण मधील शेकापचे काही नेते आणि कार्यकर्ते आस्वाद पाटील यांच्या संपर्कात आहेत. हा गट आस्वाद पाटील यांच्या सोबत भाजप मध्ये दाखल होऊ शकतो. या शिवाय आस्वाद पाटील यांना जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीची अचूक जाण आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेकापचा असलेला प्रभाव कमी करण्यासाठी त्यांची मदत उपयुक्त ठरू शकते.शेकाप हा लढवय्या पक्ष.कोकणात,विदर्भात या पक्षाची ताकत मोठी होती.शेकापचा जन्म सोलापुरात झाला.काँग्रेसची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आणि शेतकरी व कामगार यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उदात्त हेतूने या पक्षाची स्थापना झाली.या पक्षाने सत्ताधारी पक्षाशी नेहमीच झुंज दिली आहे.जनता राजवटीत शेकापचे वर्चस्व कोकणात अधिक होते मात्र याच पक्षाने पुढे पुढे काँग्रेसचा पदर धरायला सुरूवात केली.काँग्रेसची शकले उडाल्यानंतर शेकापने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आश्रय घेतला.ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील हे काँग्रेस आघाडीकडे झुकले.

त्यानुसार सांगोल्याचे माजी आमदार स्व.गणपतआबा देशमुख यांना पक्षाची भूमिका मान्य करावी लागली आणि ते काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये कृषी मंत्री झाले होते.पुढे एन.डी.पाटील यांंचे काँग्रेस आघाडीशी भिनसले आणि शेकाप बाहेर पडला.आता शेकाप सोलापूरसह कोकणात,विदर्भात शेकापची ताकत कमकुवत झाली आहे.लढा किती दिवस द्यायचा.सत्ता कधी उपभोगायची.ही अभिलाषा शेकापमध्ये पसरलीय.त्यामुळे पक्षांतर सुरू झाले.शेतकरी संघटनांची आज काय अवस्था झाली आहे.सत्ता आणि पदांची चटकही त्यांना लागली आहे.तेव्हा शेतकरी आणि कामगार यांना वालीच उरलेला नाही.आस्वाद पाटील यांना भाजपने मोठे पद देवू केलेले असणार पण ते भाजपत किती काळ रमणार हा खरा प्रश्न आहे.शेकापची वाताहत होत चालली आहे,याचे दुःख वाटते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button