नाझरा(वार्ताहर):- चोपडी केंद्रात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगर येथील इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. चौथीत शिकणाऱ्या या चिमुकल्या साड्या घालून आज शाळेत दाखल झाल्या तर काही विद्यार्थी नवीन ड्रेस मध्ये हजर झाले. पाचवीला दुसऱ्या शाळेत जाण्याची ओढ तर चार वर्ष शिकलेल्या या शाळेतून बाहेर पडण्याची हुरहूर या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून निरोप समारंभ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविकातून शाळेच्या शिक्षिका रूपाली पवार यांनी अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या आठवणी आमच्या मनात कायम राहतील असे विचार व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
स्वप्नाली पारेकर, प्रज्ञा जवंजाळ, काजल वाघमारे , अंकिता बाबर, सिद्धी केंगार, वेदांत मेखले या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.काही विद्यार्थ्यांनी भेटकार्ड व भेटवस्तू देऊन शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पहिली ते तिसरी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला. शाळेचे मुख्याध्यापक राजाराम बनसोडे यांनी तुमच्या कर्तुत्वामुळे शाळेचे नाव मोठे व्हावे असा प्रयत्न करा, यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचून जाऊ नका असा संदेश दिला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथी प्रज्ञाशोध परीक्षेमधील यशाबद्दल शाळेकडून ,सिद्धी केंगार प्रज्ञा जवंजाळ व अंकिता बाबर या विद्यार्थिनींना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत व चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ याचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजनाची मेजवानी देण्यात आली.