लहू कांबळे यांची शिक्षणविस्ताराधिकारी पदी निवड

महूद, ता. २८ : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पदोन्नतीने लहू कांबळे यांची सांगोला तालुक्यातील महूद बीटचे शिक्षणविस्ताराधिकारी पदी निवड झाली आहे.
सन १९८६ मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत हजर झालेल्या लहू कांबळे यांनी माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात उपशिक्षक म्हणून अनेक वर्षे काम पाहिले.त्यावेळी शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामध्ये लहू कांबळे हे अग्रभागी असत. त्यांचे मार्गदर्शनाखाली तांदुळवाडी परिसरात विविध शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबविले गेले.नोकरीच्या सुरुवातीच्या काळापासूनच मित्रांना सहकार्य करण्याच्या सवयीतून ते शिक्षक संघटनेच्या कामात सहभागी झाले. खेड्यापाड्यातील-वाडीवस्तीवर काम करणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःला झोकून देऊन त्यांनी काम केले.माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी केलेली कामे आजही लक्षवेधी ठरत आहेत.शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांच्या नेतृत्वाखाली लहू कांबळे हे राज्य प्राथमिक शिक्षक संघ सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
त्यांनी पंढरपूर तालुक्यातील तुंगत या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले.त्या काळात तुंगत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी सुमारे पन्नास लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव केला होता.पुढे त्यांना केंद्रप्रमुख म्हणून वाखरी व करकंब या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली.सर्व शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थ्याप्रती काम करण्याची प्रेरणा देणाऱ्या श्री.कांबळे यांच्या कार्यकाळात वाखरी व करकंब या केंद्रांची गुणवत्ता पंढरपूर तालुक्यात अतिशय उत्कृष्ट राहिली आहे.
आता शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून त्यांना सांगोला तालुक्यातील महूद येथे काम करण्याची संधी मिळाली आहे.सांगोला पंचायत समितीमध्ये ते नुकतेच रुजू झाले आहेत.यावेळी शिक्षक संघ, शिक्षक समिती,आदर्श शिक्षक समिती अशा विविध संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.



