सांगोला /प्रतिनिधी: सांगोला तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेली खरीप हंगामपूर्व कार्यशाळाही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे . कृषीच्या अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेतुन प्राप्त झालेल्या कृषी माहितीचे शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृतिशील मार्गदर्शन करावे. खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीपासून ते पेरणी, पीक व्यवस्थापन व पीक काढणी या संदर्भात कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करावे . त्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळेल हा हेतू साध्य करता येईल. यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची आहे असे प्रतिपादन पंढरपूर उपविभागीय कृषीतंत्र अधिकारी पूनम चव्हाण यांनी सांगोला येथे केले.
सांगोला तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने अधिकारी ,कर्मचारी व शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामपूर्व कार्यशाळा सोमवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंढरपूर उपविभागीय कृषीतंत्र अधिकारी पुनम चव्हाण यांनी भूषविले.
यावेळी सांगोला तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की, खरीप हंगामपूर्व कार्यशाळेत कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना होणार आहे. 15 मे पूर्वी गावांची निवड करून त्या ठिकाणी शेतीशाळा व खरीप हंगामातील पेरणी, पीक व्यवस्थापन यासंदर्भात शेतकरी केंद्रबिंदू मानून कृतिशील मार्गदर्शन करण्यात यावे. 15 मे नंतर शेतकरी खरीप हंगामाच्या कामांमध्ये व्यस्त असतात. यावर्षी प्रमुख पिकांच्या लागवडीसाठी कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे. शेतकऱ्यांनी आधुनिक पिकाबरोबर पारंपारिक देशी पिके लागवड करून चांगले उत्पादन घ्यावे. जीवन जगताना जसे नियोजन महत्त्वाचे असते तसेच नियोजन शेती उत्पादनासाठीही महत्त्वाचे आहे असे विचार तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेदरम्यान हुमणी कीड नियंत्रण प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी खरीप हंगामपूर्व कार्यशाळेत दशपर्णी अर्क तयार करणे या संदर्भात विवेक पाटील यांनी मार्गदर्शन केले .माती नमुने या विषयासंदर्भात श्रीकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे कसे महत्त्वाचे आहे या विषयावर एस. आर .बर्गे व एन एस सरगर यांनी मार्गदर्शन केले. बियाणांची उगवण क्षमता या विषयावर प्रतीक डुबल यांनी मार्गदर्शन केले. पेरणीपूर्व व पेरणी पश्चात हुमणी किड नियंत्रण या विषयासंदर्भात एस. एस चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तांत्रिक पद्धतीने मका पिकाची लागवड व उत्पादन यासंदर्भात एस. बी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. बाजरी लागवड संदर्भात कोणती दक्षता घ्यावी, कोणते तंत्रज्ञान वापरावे व अधिक उत्पादन कसे घ्यावे यासंदर्भात यु.ई. चंदनशिवे यांनी मार्गदर्शन केले.
कृषी सहाय्यक समाधान गवळी यांनी खरीप हंगामपूर्व शेतीशाळा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. शेतीशाळेतून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणी ते काढणी या दरम्यान कोणती दक्षता घ्यावी व कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळवावे यासंदर्भात मार्गदर्शन केले. एच. बी. वास्ते यांनी उसाच्या सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. एस .आर .देठे यांनी जलतारा या विषयाद्वारे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाणी शोष खड्ड्याद्वारे विहिरी व कुपनलिकांना कसे वाढेल यासंदर्भात मार्गदर्शन केले. जलतारा योजने संदर्भात सरकारकडून शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे. जलतारा योजनेतून पावसाचे वाहून जाणारे पाणी आपल्या शेतात अडवून त्याचा उपयोग स्वतःच्या शेतीसाठी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच आर .जे. टेंगले यांनी ऊस पाचट व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच आत्तार साहेब यांनी केळी लागवड व तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यशाळेसाठी सांगोला, जुनोनी, जवळा, महूद मंडल कृषीअधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, कृषीमित्र तसेच सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार महूद मंडल कृषी अधिकारी अभंग यांनी मानले.