महाराष्ट्र

डाळिंब वाणाची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उद्या सांगोला तालुक्यात

महूद, ता. ९ : डाळिंबावरील विविध रोगामुळे सांगोला तालुक्यातील ९५ टक्के पेक्षा अधिक क्षेत्रावरील डाळिंब बागा काढून टाकण्यात आलेल्या आहेत.नव्याने शोधण्यात आलेल्या शरद किंग डाळिंब वाणाची लागवड तालुक्यात हळूहळू वाढत आहे.या शरद किंग डाळिंब वाणाची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे शनिवार (ता.१०) रोजी सकाळी खिलारवाडी(ता.सांगोला) येथे येणार आहेत.

 

फलोत्पादन अभियानाचे जनक म्हणून शरद पवार यांना ओळखले जाते.ते नेहमीच कृषि क्षेत्रातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन त्यांना प्रोत्साहन देत असतात.डाळिंबाच्या शेतीमुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले होते. तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी रोजगार हमी योजनेतून डाळिंब लागवडीला प्रोत्साहन दिले.फलोत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी फळ लागवडीपासून,ठिबक सिंचन,तेलकट रोग निवारण , गारपीट,कुंपण ते फळझाडे जगविण्यासाठी आवश्यक अशी अनेक अनुदाने या काळात शेतकरी बांधवांना मिळालेली आहेत.यामुळेच सांगोल्यासारख्या पर्जन्य छायेच्या आणि खडकाळ,माळरान असणाऱ्या तालुक्यात डाळिंब बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले.शेतीसह येथील व्यापाराला मोठी चालना मिळाली.कष्टकरी शेतकऱ्यांच्या संपन्नतेत भर पडू लागली.मात्र तेलकट डागाच्या रोगासह इतर रोगामुळे तालुक्यातील ९५ टक्के डाळिंबाच्या बागांचे क्षेत्र नष्ट झाले आहे.या भागातील शेतकरी पुन्हा आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. डाळिंब बागा काढल्यानंतर शेतकऱ्यांनी विविध पिके घेण्याचे प्रयोग सुरू केले आहेत.

 

अशातच पुन्हा छत्रपती संभाजी नगर येथील शेतकरी विठ्ठल भोसले यांनी संशोधन करून शरद किंग डाळिंब या नवीन वाणाचा शोध लावला आहे. हळूहळू या शरद किंग डाळिंब वाणाची लागवड वाढू लागली आहे.खिलारवाडी (ता.सांगोला) येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी,माजी सरपंच दत्तात्रय नागणे यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रामध्ये शरद किंग डाळिंब या वाणाची एक हजार डाळिंबाची रोपे लावलेली आहेत.त्यांची ही बाग फळावर असून लवकरच ही डाळिंबे बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहेत.दत्तात्रय नागणे हे सुमारे तीस वर्षांपूर्वीपासून आपल्या शेतामध्ये डाळिंबाची बाग लावत आहेत.सुरुवातीला त्यांनी गणेश या वाणाची लागवड केली.नंतर भगवा व सध्या शरद किंग हे डाळिंब त्यांच्या शेतामध्ये आहे.शरद किंग डाळिंब वाणाची रोपे विकणारे अनेक शेतकरी येथे आहेत,मात्र या वाणाचे फलोत्पादन करणारे एक प्रमुख शेतकरी म्हणून दत्तात्रय नागणे यांच्याकडे पाहिले जाते. शनिवारी सकाळी दहा वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दत्तात्रय नागणे यांच्या शेतामध्ये उपस्थित राहून डाळिंब बागेची पाहणी करणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत तसेच मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथील सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे विलास शिंदे,अखिल भारतीय डाळिंब संशोधन संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे आदी उपस्थित राहणार आहेत.


आपली प्रगती डाळिंबाच्या बागेमुळेच..

सुमारे तीस वर्षापासून डाळिंबाचे उत्पादन घेणारे खिलारवाडी येथील दत्तात्रय नागणे यांनी शरद किंग डाळिंब वाणाची माहिती देताना सांगितले की, या वानात डाळिंबाचा आकार एक सारखा राहतो. किमान २०० ग्रॅम ते सुमारे एक किलो फळांचे वजन असते.अशी फलधारणा ९५ टक्क्यापर्यंत असते.एकंदर फळाची साईज जास्त असते.फळधारणा जास्त होते.याला काटा कमी असतो.यामुळे आम्ही या वाणाची लागवड केली आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती डाळिंब शेतीमुळेच झाली आहे. सांगोला तालुका परिसरात या वाणाचे डाळिंब लागवड वाढते आहे.- दत्तात्रय नागणे, डाळिंब उत्पादक शेतकरी (खिलारवाडी ता.सांगोला)


डाळिंब लागवडीसाठी या समस्यांवर उपाययोजना हव्यात 

१)पाणी समस्या- पीक फळांवर असतानाच अचानक पाऊस न पडल्याने,कालव्याच्या पाळी न आल्याने तसेच वीज पुरवठा खंडित झाल्याने हातातोंडाशी आलेले पीकांचे अचानक नुकसान होते.


उपाययोजना – शेतकऱ्यांना शेततळे निर्मितीसाठी शंभर टक्के अनुदान द्यावे.

किड व बुरशीजन्य रोगाचे व्यवस्थापन -डाळिंबावरील कीड व बुरशीजन्य रोग व्यवस्थापनासाठी आवश्यक औषधांसंदर्भात डाळिंब संशोधन केंद्रातर्फे संशोधन व्हावे.तसेच बेसिक औषधांच्या किंमतीवर शासनाने सबसिडी देऊन किंमती नियंत्रणात ठेवाव्यात


बाजारपेठ -डाळिंब विक्रीसाठी बाजारपेठ स्थानिक पातळीवर, तालुक्याच्या मार्केट यार्ड ठिकाणी अद्ययावत असावी.देशभरातील डाळिंब दरांशी हे दर सुसंगत असावेत.


प्रक्रिया उद्योग – खर्डा अथवा अन्य कारणांनी नाकारलेल्या डाळिंब फळांपासून ज्यूस,दंतमंजन,अगर ड्रायफूट निर्मितीसारखे काही उद्योग निर्माण करता आले तर ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळेल तसेच आर्थिक संपन्नता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button