महूद, ता. ४ : राजस्थान मध्ये पर्यावरण आणि जल संरक्षण क्षेत्रात सामाजिक भावनेने काम करणाऱ्या तरुण भारत संघ या संस्थेच्या वतीने महूद येथील कासळगंगा फाउंडेशनच्या महेंद्र महाजन यांना भीकमपुरा राजस्थान येथे जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांच्या हस्ते नदी प्रहरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
राजस्थान मधील अलवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तरुण भारत संघ ही स्वयंसेवी संस्था पर्यावरण क्षेत्रात काम करते आहे.सन १९७५ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे अध्यक्ष जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह हे आहेत. राजस्थान मधील ग्रामीण भागात जलसंरक्षण आणि जलप्रबंधन या क्षेत्रात या संस्थेने मोठे योगदान दिले आहे. या संस्थेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम नुकताच भीकमपुरा(जि.अलवर) येथे पार पडला. या कार्यक्रमात महूद येथील कासळगंगा फाउंडेशनचे महेंद्र महाजन यांना डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते नदी प्रहरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शनाखाली महेंद्र महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसहभागातून कासाळगंगा फाउंडेशनच्या माध्यमातून सांगोला,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातून वाहणाऱ्या आणि या परिसरातील २३ गावे-वाड्यांची अर्थवाहिनी असलेल्या कासाळगंगा नदीचे पुनर्जीवन करण्यात आले आहे. कासाळगंगा नदी चंद्रभागा नदीची उपनदी म्हणून साकारली आहे. या परिसरात जलसाखळी निर्माण करण्यात यश मिळवले आहे.लोकसहभागातून दुष्काळ आणि पूरमुक्तीचे छानसे मॉडेल तयार केले आहे. या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने यापूर्वीच महूदला नॅशनल वॉटर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित केले आहे. महेंद्र महाजन यांना नदी प्रहरी या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.